गार्ड ऑफ ऑनर, पुष्पवृष्टी आणि मिरवणुकीतून नवागतांचे जल्लोषात स्वागत , साने गुरुजी विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात; विद्यार्थ्यांना दिला प्रेरणेचा नवा संदेश
![]()
गार्ड ऑफ ऑनर, पुष्पवृष्टी आणि मिरवणुकीतून नवागतांचे जल्लोषात स्वागत
साने गुरुजी विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात; विद्यार्थ्यांना दिला प्रेरणेचा नवा संदेश
अमळनेर प्रतिनिधी :
साने गुरुजी कन्या हायस्कूल व साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण व आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी नवागतांना गार्ड ऑफ ऑनर देत त्यांचे सन्मानपूर्वक स्वागत केले. तसेच पायलट विद्यार्थ्यांनी नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शाळेच्या वातावरणाशी परिचित करून दिले.
यावेळी नवागत विद्यार्थ्यांची शालेय परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या उत्साही वातावरणात आणि टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आल्याने शाळेचा परिसर आनंदाने फुलून गेला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे अभिनंदन केले. त्यामुळे नवागत विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील, सहसचिव ॲड. अशोक बाविस्कर तसेच संचालक मंडळातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या शैक्षणिक परंपरा, उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तर मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगत नियमित अभ्यास, शिस्त आणि संस्कार यांचा जीवनात अंगीकार करण्याचे आवाहन केले.
या स्वागत सोहळ्यात साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील नव्याने प्रवेश घेतलेले विद्यार्थी तसेच साने गुरुजी कन्या हायस्कूलमधील नवागत विद्यार्थीनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आत्मीयता आणि आपलेपणाची भावना निर्माण झाल्याचे दिसून आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ए. धनगर यांनी केले तर मुकेश पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. एनसीसीच्या विद्यार्थ्यांना समाधान पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
नव्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करत साने गुरुजी विद्यालयाने ‘शाळा म्हणजे दुसरे घर’ हा संदेश प्रभावीपणे दिला.

