बैलगाडीतून विद्यार्थ्यांची आगमन मिरवणूक; शिरूड शाळेचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न , गुलाबपुष्प, पुस्तक वाटप, गोड जेवण आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला वाव
![]()
बैलगाडीतून विद्यार्थ्यांची आगमन मिरवणूक; शिरूड शाळेचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न
गुलाबपुष्प, पुस्तक वाटप, गोड जेवण आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला वाव
अमळनेर प्रतिनिधी :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरूड येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी आयोजित करण्यात आलेला ‘प्रवेशोत्सव २०२६’ कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नव्याने शाळेत दाखल होणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे गावकऱ्यांनी मोठ्या आनंदात स्वागत करत शिक्षणाबद्दलची आपली बांधिलकी अधोरेखित केली.
प्रवेशोत्सवानिमित्त सकाळी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची ढोल-ताशांच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. विशेष आकर्षण म्हणजे प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना श्री. धनराज आत्माराम पाटील यांनी सुशोभित केलेल्या बैलगाडीतून शाळेत आणण्यात आले. गावातील विविध ठिकाणी विद्यार्थ्यांची आरती करून त्यांचे स्वागत करण्यात आले. या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
मिरवणुकीत माजी सभापती बापूसो शाम अहिरे, माजी मुख्याध्यापक श्री. एन. टी. पाटील, नानासाहेब जयवंतराव पाटील, आप्पासाहेब आधार धनगर, विजू मास्टर, गुलाबराव पाटील, संदीप पाटील, भैय्यासाहेब पाटील, बापूराव पाटील, आप्पा मोरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
शाळेत आगमन झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, पुस्तके व विविध शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षक-शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांना प्रेमळ वातावरणात शाळेची ओळख करून दिली.
यावेळी ‘शाळापूर्व तयारी मेळावा-२’ चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यात आला. विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत झाली. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. विजय आधार पाटील, सदस्य सौ. उज्वला मनोहर पाटील, उपाध्यक्ष मुकेश लोटन पाटील, ज्ञानेश्वर माळी, कल्पेश साहेबराव भिल, संजय धनगर, मुख्याध्यापक श्री. किरण मारवडकर, अंगणवाडी सेविका सौ. कुलकर्णी ताई यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक
श्री. चंद्रकांत पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. संगीता पाटील मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. कल्पना बडगुजर मॅडम, इंदुबाई महाले मॅडम, श्री. रवींद्र महाजन सर तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनी यांनी परिश्रम घेतले.
शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले आणि आनंददायी वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. शिक्षणाची गोड सुरुवात करणारा हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला.

