वेदांत बंडगर हत्या; कुणाचीही गय नाही, आरोपींना मोका लावणार – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
![]()
वेदांत बंडगर हत्या; कुणाचीही गय नाही, आरोपींना मोका लावणार
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
निष्पाप वेदांत बंडगरच्या हत्येची घटना गंभीर, दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. वेदांतच्या कुटुंबियांच्या दुःखात मी आणि राज्य शासन सहभागी आहोत. या प्रकरणात पीडितांना न्याय देण्यासाठी पालकमंत्री म्हणून पोलीस दल आणि प्रशासनाला कडक सूचना केल्या असून या गुन्ह्यात कुणाचीही गय केली जाणार नाही किंवा हस्तक्षेप वा दबाव खपवून घेतला जाणार नाही.
आपण या प्रकरणाची माहिती घेतली असून घटना घडल्यापासून तपाससंदर्भातील हालचालींवर वेळोवेळी आपले बारकाईने लक्ष आहे. या दुर्दैवी घटनेबाबत मी व राज्य शासन अत्यंत संवेदनशील आहे. या प्रकरणातील प्रत्येक दोषी व्यक्तीला कायद्यापुढे उभे करण्यासाठी पोलीस यंत्रणेने पूर्ण क्षमतेने काम करण्याच्या सूचना दिल्या असून, पीडिताच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.
पोलिसांनी तपासात गती घेतली असून, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी निलेश गडदे व त्याचा साथीदार अतुल वायदंडे यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फिर्यादीत नमूद असलेल्या अन्य तीन आरोपींचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेला एकही आरोपी सुटणार नाही, ही शासनाची स्पष्ट भूमिका आहे. तपासातून उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे या गुन्ह्यामागील संपूर्ण साखळी उघडकीस आणण्यासाठी या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) चे कलम लागू करण्याची कार्यवाही सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या थेट मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. फिर्यादीत नमूद इतर 3 आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जत पोलीस ठाण्यात यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्याचीही गंभीर दखल घेण्यात आली आहे. संबंधित पोलीस निरीक्षकांचा प्राथमिक चौकशी अहवाल कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे सादर करण्यात आला असून संबंधित पोलीस निरीक्षक यांना नियंत्रण कक्षास संलग्न करण्यात आले आहे.
या प्रकरणात कोणालाही अभय दिले जाणार नाही, कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही आणि कोणताही दोषी सुटणार नाही. तसेच कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. तपासात समोर येणारा कोणताही व्यक्ती कितीही प्रभावशाली अथवा कोणत्याही स्तरावरील असला तरी त्याला कायद्याच्या चौकटीत आणले जाईल. निष्पक्ष, पारदर्शक आणि वेगवान तपासाद्वारे पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे

