नोबेलच्या इस्रो-आयआयटी सहलीतून मिळाली प्रेरणा; लाभेशने गाठले आयआयटी जोधपूरचे स्वप्न
1 min read

नोबेलच्या इस्रो-आयआयटी सहलीतून मिळाली प्रेरणा; लाभेशने गाठले आयआयटी जोधपूरचे स्वप्न

Loading

नोबेलच्या इस्रो-आयआयटी सहलीतून मिळाली प्रेरणा; लाभेशने गाठले आयआयटी जोधपूरचे स्वप्न

जळगाव : कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर लाभेश हेमंत बाहेती याने विविध राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या कुटुंबासह जिल्ह्याचे नावही उज्ज्वल केले आहे. विशेष म्हणजे, जेईई ॲडव्हान्स परीक्षेत यश मिळवत त्याची देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांपैकी (IIT) एक असलेल्या आयआयटी जोधपूर येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेसाठी निवड झाली आहे. छाया यशाबद्दल नुकताच नोबेल फाउंडेशन तर्फे त्याचा आई-वडिलांसह सत्कार करण्यात आला.

लाभेशच्या यशाचा प्रवास नोबेल फाऊंडेशनच्या नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेपासून सुरू झाला. या परीक्षेद्वारे त्याची संपूर्ण महाराष्ट्रातून निवड झालेल्या अवघ्या ५० विद्यार्थ्यांमध्ये गणना झाली होती. या निवडीमुळे त्याला इस्रो आणि आयआयटी संस्थांच्या शैक्षणिक सहलीत सहभागी होण्याची संधी मिळाली. आयआयटी गांधीनगर येथे झालेल्या भेटीदरम्यान तेथील शैक्षणिक वातावरण, संशोधन संस्कृती आणि विद्यार्थ्यांच्या कामगिरीने प्रेरित होऊन बारावीनंतर आयआयटीमध्येच प्रवेश घेण्याचा निर्धार त्याने केला.

या ध्येयासाठी त्याने जेईई परीक्षेची नियोजनबद्ध तयारी केली आणि अखेर जेईई ॲडव्हान्समध्ये यश संपादन करून आयआयटी जोधपूरमध्ये प्रवेश मिळवला. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेत 99.70 पर्सेंटाइल मिळवत त्याने घवघवीत यश संपादन केले. तसेच बिट्सॅट (BITSAT) परीक्षेत 225 गुण मिळवून त्याने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.

लाभेश बाहेती हा कृषी विभागातील शास्त्रज्ञ हेमंत बाहेती व विनीता बाहेती यांचा सुपुत्र आहे. त्याच्या यशामागे कुटुंबीयांचे प्रोत्साहन, स्वतःची जिद्द आणि योग्य मार्गदर्शन यांचा मोठा वाटा आहे. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी त्याला नोबेल फाउंडेशनचे जयदीप पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

देशातील सर्वोच्च तांत्रिक संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्याचे लाभेशचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले असून त्याचे हे यश परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

फोटो- लाभेश बाहेती व आई-वडिलांचा सत्कार करताना नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील तसेच संचालिका जयश्री पाटील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *