ढोल-ताशे, फुलांचा वर्षाव आणि आतषबाजीने द्रौपदीबाई कन्या शाळेत प्रवेशोत्सवाचा जल्लोष! , विद्यार्थिनींचे औक्षण, गुलाबपुष्प वितरण व पाठ्यपुस्तक वाटपासह नव्या शैक्षणिक वर्षाचे उत्साहात स्वागत
![]()
ढोल-ताशे, फुलांचा वर्षाव आणि आतषबाजीने द्रौपदीबाई कन्या शाळेत प्रवेशोत्सवाचा जल्लोष!
विद्यार्थिनींचे औक्षण, गुलाबपुष्प वितरण व पाठ्यपुस्तक वाटपासह नव्या शैक्षणिक वर्षाचे उत्साहात स्वागत
अमळनेर प्रतिनिधी : खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळा, अमळनेर येथे शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.
शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थिनींचे औक्षण करून, फुलांचा वर्षाव करत तसेच ढोल-ताशांच्या गजरात आणि आतषबाजीच्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थिनीला गुलाबपुष्प देऊन नव्या शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विनोदजी अग्रवाल, शालेय समितीचे चेअरमन जितेंद्रभाऊ जैन, संस्थेचे ज्येष्ठ संचालक हरी भिका वाणी, प्राथमिक शाळेचे चेअरमन प्रदीपभाऊ अग्रवाल, दामिनी पथक प्रमुख श्रीमती नम्रता जरे, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री आठवले, पर्यवेक्षक एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी, ज्येष्ठ लिपिक शामभाऊ पवार, ज्येष्ठ शिक्षक एस. एस. माळी, ज्येष्ठ शिक्षिका आर. एस. सोनवणे व क्रीडा शिक्षक के. आर. बाविस्कर उपस्थित होते.
प्रवेशोत्सवानंतर प्रार्थना, राष्ट्रगीत, राज्यगीत, संविधान उद्देशिकेचे वाचन व प्रतिज्ञा घेण्यात आली. त्यानंतर सरस्वती पूजन, दीपप्रज्वलन आणि मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली.
यावेळी विद्यार्थिनींना मोफत पाठ्यपुस्तके व गुलाबपुष्पांचे वितरण करण्यात आले तसेच गोड पदार्थ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. फुलांच्या वर्षावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणाने संपूर्ण परिसर आनंदमय झाला. शाळेत आलेल्या पालकांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील आणि मुख्याध्यापिका सौ. सूर्यवंशी यांनी विद्यार्थिनींना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत अभ्यास, शिस्त आणि सर्वांगीण विकासावर भर देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती आर. एस. सोनवणे व सौ. पी. पी. जोशी यांनी केले. प्रवेशोत्सव अविस्मरणीय करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साहाने द्रौपदीबाई कन्या शाळेचा परिसर अक्षरशः फुलून गेला.




