गुलाब पुष्प, चॉकलेट टॉफी आणि आकर्षक सजावटीत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 ची उत्साहपूर्ण सुरुवात
![]()
गुलाब पुष्प, चॉकलेट टॉफी आणि आकर्षक सजावटीत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 ची उत्साहपूर्ण सुरुवात
अमळनेर प्रतिनिधी :
पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. शाळा प्रशासनाच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाब पुष्प व चॉकलेट टॉफी देऊन आनंददायी वातावरणात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली.
शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी विशेष आणि उत्सुकतेचा क्षण असतो. दीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर मित्रमैत्रिणी, शिक्षक आणि शाळेच्या वातावरणाची ओढ विद्यार्थ्यांना लागलेली असते. त्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी शाळेने विशेष उपक्रम राबविला.
यावेळी संपूर्ण शाळा परिसर आकर्षक रांगोळ्या, पुष्पपाकळ्या, स्वागत फलक आणि रंगीबेरंगी सजावटीने नटला होता. प्रवेशद्वारावर फुग्यांच्या कमानी, तोरणे आणि मनमोहक स्वागत संदेशांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले. तसेच सर्वांचे आकर्षण ठरलेला विशेष सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता. विद्यार्थी व पालकांनी या सेल्फी पॉईंटवर आनंदाने छायाचित्रे काढत आठवणी जतन केल्या.
विशेषतः नर्सरी विभागातील वर्ग आकर्षक खेळणी, रंगीत सजावट आणि बालसुलभ साहित्याने सजविण्यात आला होता. यामुळे लहान विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस अधिक आनंददायी आणि संस्मरणीय ठरला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. देवरे व समस्त शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व चॉकलेट टॉफी देऊन हार्दिक स्वागत केले. विद्यार्थ्यांसह पालकांनीही या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमासाठी सुंदर संकल्पना, उत्कृष्ट संयोजन आणि आकर्षक कलाकृतींची निर्मिती कलाशिक्षक अनंत बागल यांनी केली. तसेच शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मनापासून सहकार्य करत कार्यक्रमाला अविस्मरणीय स्वरूप प्राप्त करून दिले.
या उपक्रमासाठी शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, व्ही. पी. बडवे, प्रशांत वंजारी, अशोक महाजन, व्ही. एस. अमृतकर, शीतल कुलकर्णी, व्ही. जी. बोरोले, श्वेता कलंत्री, अनिता मराठे, वृषाली बोरसे, वैशाली भोळे तसेच समस्त शिक्षक व कर्मचारीवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
“विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी शाळेची अनोखी सुरुवात”
शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आत्मीयता, उत्साह आणि सकारात्मकता निर्माण करणारा हा उपक्रम सर्वांच्या पसंतीस उतरला.

