ज्ञान, संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश; नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत, विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण
![]()
*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात प्रवेशोत्सव, वृक्षारोपण व मोफत पाठ्यपुस्तक वितरण उत्साहात*
जळगाव दि. १५/०६/२०२६ : के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी प्रवेशोत्सव, वृक्षारोपण व मोफत पाठ्यपुस्तक वितरण असे विविध उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. “ज्ञान, संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाची जोपासना करून जागरूक, जबाबदार आणि सुसंस्कृत विद्यार्थी घडविणे” या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
प्रवेशोत्सवानिमित्त इयत्ता पाचवीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून, तिलक लावून तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. माध्यमिक शिक्षणाच्या नव्या टप्प्यात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि त्यांच्यामध्ये शाळेविषयी आत्मीयता निर्माण करणे हा या उपक्रमामागील उद्देश होता. नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतामुळे विद्यालय परिसर आनंदमय वातावरणाने फुलून गेला.
यावर्षी विद्यालयाने पर्यावरण संवर्धनासाठी एक अभिनव उपक्रम राबवत प्रत्येक वर्गाच्या प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण केले. वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी संबंधित वर्गांवर सोपविण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण व्हावी आणि वृक्षसंवर्धनाची सवय रुजावी, या हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणीची जबाबदारी श्री वेदप्रकाश गडदे, श्री विवेक मोरे आणि श्री किशोर भोई यांनी यशस्वीपणे पार पाडली.
त्यानंतर विद्यालयाच्या ड्रॉइंग हॉलमध्ये मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास के.सी.ई. सोसायटीचे संचालक व शालेय समन्वयक डॉ. ए. आर. राणे, प्रशासकीय सल्लागार श्री शशिकांत वडोतकर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे तसेच गुरुवर्य पवी पाटील प्राथमिक विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका सुजाता फालक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभापासूनच आवश्यक अध्ययन साहित्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पाठ्यपुस्तक वितरण कार्यात श्रीमती प्रतिभा नेहते, श्री बी. डी. झोपे, श्रीमती सुचेता बाविस्कर , श्री पराग राणे, श्रीमती रोशनी कोळी, श्रीमती मीनाक्षी इसे, श्रीमती रत्नमाला शिंदे तसेच इयत्ता सातवी व आठवीचे वर्गशिक्षक यांनी विशेष सहकार्य केले. सर्व शिक्षकांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पराग राणे यांनी अत्यंत प्रभावी, ओघवत्या व आकर्षक शैलीत केले. त्यांच्या निवेदनामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देताना शिक्षणासोबतच संस्कार, पर्यावरण संरक्षण, सामाजिक जाणीव आणि जबाबदार नागरिकत्व यांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे, डी ए पाटील, प्रतिभा लोहार, बिपिन झोपे,सुचिता बावस्कर, रत्नमाला शिंदे, मीनाक्षी इसे, विवेक मोरे, वेदप्रकाश गडदे,तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रवेशोत्सव, वृक्षारोपण आणि मोफत पाठ्यपुस्तक वितरण या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात झाली. शिक्षणाबरोबरच संस्कार, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधणारे विद्यार्थी घडविण्याच्या विद्यालयाच्या ध्येयाची प्रभावी प्रचिती या कार्यक्रमातून आली.

