यशाला सलाम! कल्याणेहोळ येथे गुणवंत, महिला पोलीस व अग्निवीरांचा गौरव
![]()
यशाला सलाम! कल्याणेहोळ येथे गुणवंत, महिला पोलीस व अग्निवीरांचा गौरव
जळगांव प्रतिनिधी
कल्याणेहोळ (ता. धरणगाव) : गावातील गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या युवक-युवती तसेच देशसेवेसाठी निवड झालेल्या तरुणांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला भव्य गुणवंत सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन नोबेल फाऊंडेशन, जळगाव, ग्रुप ग्रामपंचायत कल्याणेहोळ आणि विविध कार्यकारी सोसायटी, कल्याणेहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
यावेळी गावातील पहिली महिला पोलीस बनण्याचा मान मिळविणाऱ्या भाग्यश्री समाधान पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच अग्निवीर पदासाठी निवड झालेल्या हर्षल बंडू पाटील आणि भरत सुरेश पाटील यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यासोबतच इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या आई-वडिलांसह सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीपीएस फाऊंडेशन, पाळधीचे प्रतापराव गुलाबराव पाटील, धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, सामाजिक कार्यकर्ते रमेश राजाराम पाटील, सरपंच रणजित पाटील, सोपान पाटील तसेच ग्लोबल मिशन स्कूल, बाहुटेचे संचालक व उद्योजक मनोहर पाटील,शिक्षक राहुल पाटील उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगती, स्पर्धा परीक्षांचे महत्त्व, करिअर नियोजन तसेच मुला-मुलींची सुरक्षितता आणि सामाजिक जबाबदारी याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर यश संपादन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयदीप पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक रमेश राजाराम पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार समाधान पाटील यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस पाटील दीपक ऊखर्डू पाटील, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रेरणादायी उपक्रमामुळे गावातील विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. याप्रसंगी गावातील पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा फोटो – गुणवंत विद्यार्थ्यांसोबत डावीकडून सोपान पाटील, रमेश पाटील ,पोलीस निरीक्षक सुनील पवार, प्रतापराव गुलाबराव पाटील ,मनोहर पाटील राहुल पाटील.

