ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ताण-तणाव व्यवस्थापन विषयक मार्गदर्शक कार्यशाळा संपन्न
1 min read

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ताण-तणाव व्यवस्थापन विषयक मार्गदर्शक कार्यशाळा संपन्न

Loading

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ताण-तणाव व्यवस्थापन विषयक मार्गदर्शक कार्यशाळा संपन्न

जळगाव दि. ०६/०६/२०२६: के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय, माउंट आबू यांच्या वैज्ञानिक आणि अभियंता शाखेमार्फत “इकोकेअर अँड डिझास्टर मॅनेजमेंट” अंतर्गत ताण-तणाव व्यवस्थापन या विषयावरील विशेष मार्गदर्शक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ राहावे, दैनंदिन जीवनातील तसेच शैक्षणिक क्षेत्रातील तणावाचे प्रभावी व्यवस्थापन करता यावे आणि सकारात्मक जीवनमूल्यांचा अंगीकार व्हावा, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेसाठी ब्रह्मकुमारीज संस्थेच्या वतीने हरियाणातील पानिपत येथून ज्योती दीदी तसेच छत्तीसगडमधील भिलाई येथून तारिका दीदी विशेष उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थितांना ताण-तणावाची कारणे, त्याचे मानसिक व शारीरिक परिणाम तसेच त्यावर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करताना त्यांनी विशेषतः इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना आगामी बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, आत्मविश्वास वाढविणे, एकाग्रता टिकविणे आणि परीक्षेच्या भीतीवर मात करणे याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असून या काळात मानसिक संतुलन राखणे तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
याचबरोबर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही त्यांनी मार्गदर्शन करताना वाढत्या कामाचा ताण, जबाबदाऱ्यांचे व्यवस्थापन, मानसिक शांतता आणि कार्यक्षमतेत वाढ यासाठी सकारात्मक विचारसरणी, राजयोग ध्यान आणि आत्मिक सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनी स्वतःचे मानसिक स्वास्थ्य जपणे आवश्यक असल्यास विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी मार्गदर्शन करता येते, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यशाळेदरम्यान विविध प्रात्यक्षिके, संवादात्मक सत्रे आणि उदाहरणांच्या माध्यमातून उपस्थितांना तणावमुक्त जीवनशैलीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. राजयोग ध्यानाच्या काही सोप्या पद्धतींचाही परिचय करून देण्यात आला. त्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमाचे आयोजन ब्रह्मकुमारीज संस्थेच्या जळगाव केंद्राच्या राज दीदी यांच्या पुढाकारातून करण्यात आले. कार्यक्रमास ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक श्री नरेंद्र पालवे, गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका श्रीमती धनश्री फालक, दोन्ही शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच इयत्ता दहावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यशाळेमुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना आगामी परीक्षांचा सामना आत्मविश्वासाने करण्याची प्रेरणा मिळाली, तर शिक्षक व कर्मचाऱ्यांना दैनंदिन जीवनातील तणावाचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन प्राप्त झाले. तणावमुक्त, सकारात्मक आणि संतुलित जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या मूल्यांची जाणीव करून देणारी ही कार्यशाळा सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र मिरकुटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी ब्रह्मकुमारीज संस्थेचे तसेच विद्यालय प्रशासनाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *