१० दिवस पाण्याविना झामी चौक; नागरिकांच्या संतापाचा उद्रेक , नगर परिषदेच्या निष्काळजीपणामुळे पाणीपुरवठा ठप्प; विक्रांत पाटील यांच्या पुढाकाराने प्रश्न मार्गी
![]()
१० दिवस पाण्याविना झामी चौक; नागरिकांच्या संतापाचा उद्रेक
नगर परिषदेच्या निष्काळजीपणामुळे पाणीपुरवठा ठप्प; विक्रांत पाटील यांच्या पुढाकाराने प्रश्न मार्गी
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या असून, झामी चौक परिसरातील नागरिकांना तब्बल १० ते १२ दिवस पिण्याच्या पाण्याविना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कावरच गदा आल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झामी चौक येथील नव्याने बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीजवळील मुख्य व्हॉल ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून वाळू व माती टाकून झाकला गेला होता. त्यामुळे परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला. मात्र एवढी गंभीर समस्या निर्माण होऊनही संबंधित विभागाकडून वेळेत दखल घेण्यात आली नाही. नागरिकांनी वारंवार तक्रारी व पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
पाण्याअभावी नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती, खासगी टँकरचा आधार आणि घरगुती कामांमध्ये अडचणी अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागले. वाढत्या उन्हाळ्यात ही परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती.
प्रशासनाच्या उदासीनतेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अखेर स्वतःच पुढाकार घेतला. शेतकी संघ संचालक विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जितेंद्र ठाकूर, प्रकाश महाजन, कैलास महाजन, अशोक पाटील, हितेश बडगुजर, अशोक नेवे, शुभम शिंपी, परेश उदेवाल आणि राजेंद्र पाटील आदी नागरिकांनी घटनास्थळी जाऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतले. यावेळी नगर परिषद कर्मचारी विजय विसावे यांनीही तातडीने हस्तक्षेप करत मुख्य व्हॉल मोकळा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली.
नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांनंतर अखेर बंद पडलेला व्हॉल कार्यान्वित करण्यात आला आणि ११ ते १२ दिवसांनंतर परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला.
या संपूर्ण प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, “आंधळे दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय” अशा शब्दांत प्रशासनाच्या कारभारावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच संबंधित ठेकेदार, कंत्राटी कर्मचारी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
शहरातील पाणीपुरवठ्यासारख्या अत्यावश्यक सेवांमध्ये अशा प्रकारची निष्काळजीपणा वारंवार समोर येत असल्याने नगर परिषद प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भविष्यात नागरिकांना अशा हालअपेष्टा सहन कराव्या लागू नयेत, यासाठी जबाबदारी निश्चित करून तातडीने ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

