हा सन्मान माझ्या कार्याची पावती’ — ज्ञानेश्वर पाटील; सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात  , कळमसरे ग्रामपंचायतीत भावनिक क्षण; ज्ञानेश्वर पाटील यांना निरोप, नितीन पाटील यांचे स्वागत
1 min read

हा सन्मान माझ्या कार्याची पावती’ — ज्ञानेश्वर पाटील; सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात , कळमसरे ग्रामपंचायतीत भावनिक क्षण; ज्ञानेश्वर पाटील यांना निरोप, नितीन पाटील यांचे स्वागत

Loading

‘हा सन्मान माझ्या कार्याची पावती’ — ज्ञानेश्वर पाटील; सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात

कळमसरे ग्रामपंचायतीत भावनिक क्षण; ज्ञानेश्वर पाटील यांना निरोप, नितीन पाटील यांचे स्वागत

अमळनेर प्रतिनिधी
कळमसरे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानेश्वर पाटील हे नियत वयोमानानुसार ३१ मे २०२६ रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या सेवापूर्ती निमित्त ग्रामपंचायत कार्यालयात भव्य सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. याचवेळी नव्याने नियुक्त झालेले ग्रामपंचायत अधिकारी नितीन भूपेंद्रसिंग पाटील यांचेही स्वागत व सत्कार करण्यात आला.

ग्रामपंचायतीतर्फे सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्रसिंग पाटील, सदस्य प्रमिलाबाई चौधरी, मिनाबाई कुंभार, दिनकर चव्हाण, देविदास बडगुजर, मंगल भिल, हेमंत चौधरी तसेच ग्रामपंचायत अधिकारी संघटना, विकास सोसायटीचे पदाधिकारी, महसूल व आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, बचत गटांच्या प्रतिनिधी महिला, पत्रकार बांधव आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर पाटील यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे सचिव नितीन पाटील तसेच देविदास माळी उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना ज्ञानेश्वर पाटील म्हणाले, “संपूर्ण कळमसरे ग्रामस्थांनी माझा केलेला हा भव्य सेवापूर्ती सत्कार म्हणजे माझ्या कार्याची मिळालेली पावती आहे. ३५ वर्षांच्या सेवाकाळात विविध ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली; मात्र एवढा सन्मान मला अन्यत्र कुठेही लाभला नाही. यासाठी मी संपूर्ण गावाचा कायम ऋणी राहीन.”

अध्यक्षीय भाषणात संजय पाटील यांनी, “एखाद्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा इतक्या मोठ्या प्रमाणात गौरव होणे, हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे आणि गावाच्या विकासातील योगदानाचे द्योतक आहे,” असे गौरवोद्गार काढले.

यावेळी सचिव नितीन पाटील, ग्रामस्थ किसनसिंग राजपूत, निवृत्त प्राचार्य जे. वाय. कुंभार, दस्तगीर पिंजारी, सौ. उषा पाटील तसेच नवनियुक्त ग्रामपंचायत अधिकारी नितीन भूपेंद्रसिंग पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी ज्ञानेश्वर पाटील यांनी ज्या-ज्या गावांमध्ये सेवा बजावली, त्या गावांच्या विकासात मोलाचे योगदान दिल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित असल्याने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हिरालाल पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भागवत कोळी, प्रदीप महाजन, योगेंद्र पाटील, गुलाब वडार, बुधा वडार तसेच ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *