साने गुरुजी शाळेत क्रिकेट गुणवंतांचा गौरव; बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न  ,”ट्रॉफी म्हणजे केवळ सन्मान नव्हे, तर मेहनत, शिस्त आणि जिद्दीचा गौरव”
1 min read

साने गुरुजी शाळेत क्रिकेट गुणवंतांचा गौरव; बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न ,”ट्रॉफी म्हणजे केवळ सन्मान नव्हे, तर मेहनत, शिस्त आणि जिद्दीचा गौरव”

Loading

साने गुरुजी शाळेत क्रिकेट गुणवंतांचा गौरव; बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

“ट्रॉफी म्हणजे केवळ सन्मान नव्हे, तर मेहनत, शिस्त आणि जिद्दीचा गौरव”

अमळनेर प्रतिनिधी :
महेश अकॅडमी व्होकेशनल व साने गुरुजी शाळेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रिकेट खेळाडूंच्या भव्य बक्षीस वितरण सोहळ्याला विद्यार्थी, पालक, शिक्षक, क्रीडाप्रेमी आणि मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. साने गुरुजी शाळेच्या क्रीडांगणावर पार पडलेल्या या सोहळ्यात क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, गोल्ड मेडल व सिल्व्हर मेडल देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादासाहेब शरद सोनवणे होते, तर प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक कोच राकेश पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी खानदेश शिक्षण मंडळाचे सचिव दादासाहेब संदीपजी घोरपडे तसेच माजी केंद्रप्रमुख आबासाहेब गोकुळ पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कोच राकेश पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर गुणवंत खेळाडूंना मान्यवर व पालकांच्या हस्ते ट्रॉफी, गोल्ड मेडल आणि सिल्व्हर मेडल प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे या ट्रॉफी स्वर्गीय परेश सोनवणे यांच्या स्मरणार्थ देण्यात आल्या.

यावेळी मार्गदर्शन करताना दादासाहेब संदीपजी घोरपडे म्हणाले, “आज मैदानावर जो घाम दिसतोय, उद्या तोच यशाच्या शिखरावर चमकणार आहे. क्रिकेट हा केवळ खेळ नसून शिस्त, संयम आणि संघभावना शिकवणारी जीवनशाळा आहे. सचिन, विराट, धोनी यांसारखे महान खेळाडू एका रात्रीत घडले नाहीत. हजारो वेळा अपयश स्वीकारून त्यांनी यशाची शिखरे गाठली. त्यामुळे परिश्रम, सातत्य आणि जिद्द यांना पर्याय नाही.”

त्यांनी कोचच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “कोच हा मैदानावरील गुरु असतो. तो खेळाडूच्या चुका दाखवतो, आत्मविश्वास वाढवतो आणि योग्य दिशा देतो. जिंकणे-हारणे हा खेळाचा भाग आहे; मात्र प्रत्येक पराभव पुढील विजयाची तयारी असतो.”

आबासाहेब गोकुळ पाटील यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात खेळाचे आरोग्यदायी महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, “पहिले सुख निरोगी काया. खेळाडू शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे त्याच्यात धैर्य, संयम आणि सकारात्मक विचार निर्माण होतात. ज्याचे शरीर निरोगी, त्याचे मन आणि बुद्धीही निरोगी असते.”

कोच राकेश पवार यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी सांगितले की, “वयाच्या तेराव्या वर्षापासून क्रिकेट क्षेत्रात कार्यरत असलेले राकेश पवार यांनी अमळनेरचे नाव राज्यभर उज्ज्वल केले आहे. त्यांनी १९२ सामन्यांमध्ये अंपायर म्हणून काम पाहिले आहे. अत्यल्प शुल्कात ते ग्रामीण व गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रिकेट प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करून अमळनेरचा नावलौकिक वाढवत आहेत.”
यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांनी सांगितले, “आज तुम्ही शाळेचे, गावाचे नाव उज्वल केले आहे. उद्या जिल्हा, राज्य आणि देशाचे नाव मोठे कराल. बॅट हातात घेतली की जबाबदारीही हातात येते. शिस्त, मेहनत, चारित्र्य आणि निर्व्यसनीपणा हेच यशाचे खरे आधारस्तंभ आहेत.”
कार्यक्रमात शिक्षक आणि कोच यांच्या भूमिकेचाही विशेष गौरव करण्यात आला. “खेळाडू घडवणारा कोच असतो, पण माणूस घडवणारा शिक्षक असतो. शिक्षण आणि खेळ यांचा समतोलच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवतो,” असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना मान्यवरांनी “स्वप्न बघा, पण त्यासाठी कठोर मेहनत करा. वेळेचे पालन, योग्य आहार, शिक्षक व कोचचा आदर आणि सातत्यपूर्ण सराव हेच मोठ्या खेळाडूंची ओळख आहे,” असा संदेश दिला.
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून त्यांना भविष्यात अधिक मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाच्या शेवटी कोच राकेश पवार यांनी उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. क्रिकेट क्षेत्रात पुढील वाटचालीसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत त्यांनी अधिक जोमाने सराव करण्याचे आवाहन केले.

“आजचा विजेता उद्याचा आदर्श असतो; चला खेळू, जिंकू आणि घडू!” या प्रेरणादायी संदेशाने संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *