देवगाव–देवळीच्या दोन गुणवंतांची भारतीय हवाई दलात भरारी; तेजस पाटील व यशस्वी पाटील यांची निवड
![]()
देवगाव–देवळीच्या दोन गुणवंतांची भारतीय हवाई दलात भरारी; तेजस पाटील व यशस्वी पाटील यांची निवड
अमळनेर प्रतिनिधी :
देवगाव–देवळी गावासाठी अत्यंत अभिमानाची व गौरवास्पद बातमी समोर आली आहे. गावातील दोन होतकरू व गुणवंत युवक-युवती कुमार तेजस पुंडलिक पाटील आणि कुमारी यशस्वी प्रवीण पाटील यांची भारतीय हवाई दल (Indian Air Force) मध्ये निवड झाली असून, त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावातील माजी सरपंच पुंडलिक छबिलाल पाटील यांचे सुपुत्र तेजस पुंडलिक पाटील तसेच कष्टाळू व्यक्तिमत्त्व प्रवीण छबिलाल पाटील यांची कन्या यशस्वी प्रवीण पाटील यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर हे यश संपादन केले आहे. भारतीय हवाई दलासारख्या प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक क्षेत्रात निवड होणे ही केवळ वैयक्तिक कामगिरी नसून संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
विशेष म्हणजे, तेजस आणि यशस्वी हे दोघेही महात्मा फुले हायस्कूल, देवगाव–देवळीचे माजी विद्यार्थी आहेत. शालेय जीवनापासूनच त्यांनी अभ्यासाबरोबरच शिस्त, मेहनत आणि ध्येयाप्रती निष्ठा जोपासली. त्यामुळेच आज त्यांना देशसेवेची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.
आदर्श देवगाव–देवळी संघर्ष अभ्यासिका या उपक्रमातून अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षा आणि करिअर क्षेत्रांसाठी मार्गदर्शन घेत आहेत. या अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांबाबत जागृती निर्माण झाली असून सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशाची शिखरे गाठत आहेत. तेजस आणि यशस्वी यांचे यश हे गावातील नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.
या दोघांच्या निवडीबद्दल गावातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार तसेच विविध संस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे देवगाव–देवळी गावाच्या नावलौकिकात भर पडली असून इतर विद्यार्थ्यांनाही मोठी प्रेरणा मिळाली आहे.
यशस्वी आणि तेजस यांचे अभिनंदन देवगाव देवळी महात्मा फुले हायस्कूलचे चेअरमन व
संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील, संचालक मंडळ, महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन तसेच सर्व शिक्षकवृंदांनी केले असून, त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
“गावातील युवक-युवतींनी मोठी स्वप्ने पाहून कठोर परिश्रम केल्यास कोणतेही ध्येय अशक्य नसते,” हे तेजस आणि यशस्वी यांच्या यशातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

