खतांच्या वाढत्या दरांनी शेतकरी संकटात; शासनाने तातडीने दर कमी करावेत – प्रमोद पाटील चिलाणेकर
![]()
खतांच्या वाढत्या दरांनी शेतकरी संकटात; शासनाने तातडीने दर कमी करावेत – प्रमोद पाटील चिलाणेकर
जळगाव प्रतिनिधी :
भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जात असला, तरी आजही शेतकरी मोठ्या कष्टाने शेती करत असून आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. शेतीमालाला हमीभाव नसणे, वाढते उत्पादन खर्च, डिझेल दरवाढ आणि त्यातच रासायनिक खतांच्या अवाजवी वाढलेल्या किमतींमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या दरवाढीने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
शेतकरी वर्षभर कष्ट करूनही कर्जाच्या ओझ्याखाली दबला जात असून संसाराचा गाडा मोठ्या हिमतीने पुढे नेत आहे. अशातच बियाणे व खतांच्या किमतींमध्ये झालेली मोठी वाढ शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सध्या बाजारात खतांचे दर गगनाला भिडले असून २०:२०:० खताची बॅग १८०० रुपये, अमोनियम सल्फेट १४०० रुपये, १०:२६:२६ खत २१०० रुपये, १६:१६:१६ खत २०५० रुपये, १५:१५:१५ खत २०२५ रुपये तर २०:२०:१३ खत २००० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. सरासरी प्रत्येक खताच्या बॅगेमागे सुमारे ३०० रुपयांची वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
खरीप हंगामाची सुरुवात होत असताना डिझेलचा तुटवडा आणि वाढते खतांचे दर यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून रासायनिक खतांच्या किमती कमी कराव्यात, अशी मागणी कै. आबासाहेब खंडेराव पाटील सहकारी फ्रुटसेल संस्थेचे संचालक तथा जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग फेडरेशनचे संचालक प्रमोद पाटील चिलाणेकर यांनी शेतकरी बांधवांच्या वतीने केली आहे.

