धरणगावातील वाघ परिवाराने सत्यशोधक पद्धतीने पार पाडले गंधमुक्त व उत्तरकार्य  शोषणमुक्त समाज निर्माण करण्यासाठी समाजाने सत्यशोधक समाजाची कास धरावी : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ )  दिवंगत श्रद्धाच्या स्मृतीप्रित्यर्थ १०० गरजू विद्यार्थ्यांना गणवेश देणार : आबासाहेब राजेंद्र वाघ  उपस्थितांना गोविंद पानसरे लिखित १०० ‘शिवाजी कोण होता?’ ग्रंथ भेट
1 min read

धरणगावातील वाघ परिवाराने सत्यशोधक पद्धतीने पार पाडले गंधमुक्त व उत्तरकार्य शोषणमुक्त समाज निर्माण करण्यासाठी समाजाने सत्यशोधक समाजाची कास धरावी : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ ) दिवंगत श्रद्धाच्या स्मृतीप्रित्यर्थ १०० गरजू विद्यार्थ्यांना गणवेश देणार : आबासाहेब राजेंद्र वाघ उपस्थितांना गोविंद पानसरे लिखित १०० ‘शिवाजी कोण होता?’ ग्रंथ भेट

Loading

धरणगावातील वाघ परिवाराने सत्यशोधक पद्धतीने पार पाडले गंधमुक्त व उत्तरकार्य

शोषणमुक्त समाज निर्माण करण्यासाठी समाजाने सत्यशोधक समाजाची कास धरावी :
पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ )

दिवंगत श्रद्धाच्या स्मृतीप्रित्यर्थ १०० गरजू विद्यार्थ्यांना गणवेश देणार : आबासाहेब राजेंद्र वाघ

उपस्थितांना गोविंद पानसरे लिखित १०० ‘शिवाजी कोण होता?’ ग्रंथ भेट

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

धरणगाव प्रतिनिधी : पी डी पाटील सर

धरणगाव : वैयक्तिक दुःखालाही समाजजागृतीची दिशा देत धरणगावातील वाघ परिवाराने एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते रमेश व सतिष जगन्नाथ वाघ यांची पुतणी आणि ललिता व आबासाहेब राजेंद्र वाघ यांची कन्या दिवंगत श्रद्धा (ताऊ) हिच्या स्मृतिप्रीत्यर्थ दशपिंड, गंधमुक्ती व उत्तरकार्याचा संपूर्ण विधी सत्यशोधक पद्धतीने पार पाडण्यात आला. अंधश्रद्धा आणि कर्मकांडाला फाटा देत विवेक, समता आणि समाजप्रबोधनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाची धरणगावसह परिसरात मोठी चर्चा होत असून, विविध स्तरांतून वाघ परिवाराच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संत, महापुरुष आणि महामाता यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सत्यशोधक समाजाचे विधीकर्ते शिवदास महाजन यांनी सत्यशोधक समाजाची प्रार्थना म्हणत साधेपणा, विवेक आणि मानवतावादी मूल्यांवर आधारित विधी संपन्न केला. कोणत्याही अनिष्ट चालीरीती, कर्मकांडशिवाय पार पडलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांवर सकारात्मक ठसा उमटविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी समाजाचे सचिव आर डी महाजन यांनी केले. तद्नंतर सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ” महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी दिलेला समता, शिक्षण आणि विज्ञाननिष्ठ विचारांचा वारसा जपणे ही आजच्या समाजाची गरज आहे. अंधश्रद्धा आणि कर्मकांडापेक्षा मानवसेवा, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तन हाच खरा धर्म आहे. शोषणमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने सत्यशोधक विचार स्वीकारले पाहिजेत.”

यावेळी आबासाहेब राजेंद्र वाघ यांनी आपल्या दिवंगत कन्या श्रद्धाच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ आर्थिकदृष्ट्या दुर्बल व होतकरू १०० विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्याची घोषणा केली. त्यांच्या या समाजहिताच्या निर्णयाचे उपस्थितांनी उत्स्फूर्त स्वागत केले. दुःखाचे रूपांतर समाजोपयोगी कार्यात करण्याचा हा संदेश अनेकांच्या मनाला स्पर्शून गेला.

पुरोगामी चळवळीचे नेते तुळशीराम बापू आणि भाजप नेते ॲड. संजय महाजन यांनी आपल्या मनोगतात जगन्नाथ खंडू वाघ यांच्या परिवाराने अनेक वर्षांपासून पुरोगामी, परिवर्तनवादी आणि सत्यशोधक विचारांची परंपरा जपली असून, “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले” ह्या उक्तीनुसार वाघ परिवाराचे निरंतर कार्य असून, श्रद्धाच्या स्मृतीतून समाजासाठी प्रेरणादायी कार्य करण्याचा घेतलेला निर्णय हा संपूर्ण समाजासाठी अनुकरणीय असल्याचे सांगत ॲड. महाजन यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

कार्यक्रमातील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणजे उपस्थित सर्वांना ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या विचारप्रवर्तक १०० ग्रंथाचे मोफत वितरण करण्यात आले. वाचनसंस्कृती, विवेकवादी विचार आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, भाजप नेते ॲड. संजय महाजन, ॲड. व्ही.एस.भोलाणे, शिवसेना नेते पी. एम. पाटील, नगरसेवक विनय भावे, गटनेते कैलास माळी, नगरसेवक लक्ष्मणराव पाटील, लक्ष्मण महाजन, हेमंत महाजन, किरण अग्निहोत्री, भूषण धनगर, महेंद्र तायडे, भरत शिरसाठ, गुलाब महाजन, हरी महाजन, महेंद्र महाजन, राहुल रोकडे, रामकृष्ण चौधरी, गोरख देशमुख, हेमंत माळी, कविराज पाटील, प्रल्हाद महाजन, दिनेश महाजन, मयुर भामरे यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, क्रीडा, साहित्य, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, विविध संघटनांचे पदाधिकारी, आप्तेष्ट आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवंगत श्रद्धाच्या स्मृतीतून समाजसेवा, विवेकवाद, शिक्षण आणि समतेचा संदेश देणारा हा उपक्रम केवळ एका कुटुंबाचा वैयक्तिक कार्यक्रम न ठरता समाजाला नवी दिशा देणारा आणि परिवर्तनवादी विचारांना बळ देणारा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *