गुरु रविदास क्लबचा प्रेरणादायी उपक्रम; चर्मकार समाजातील ९८ गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार , उच्च शिक्षण, जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर समाजातील युवकांनी प्रशासन, उद्योग व संशोधन क्षेत्रात झेप घ्यावी – मान्यवरांचे आवाहन
![]()
गुरु रविदास क्लबचा प्रेरणादायी उपक्रम; चर्मकार समाजातील ९८ गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार
उच्च शिक्षण, जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर समाजातील युवकांनी प्रशासन, उद्योग व संशोधन क्षेत्रात झेप घ्यावी – मान्यवरांचे आवाहन
जळगाव प्रतिनिधी
गुरु रविदास क्लब, जळगावच्या वतीने चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरवासाठी आयोजित करण्यात आलेला गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ रविवारी (दि. १२ जुलै) केमिस्ट भवन, जिल्हापेठ, जळगाव येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दहावी, बारावी, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर पदवी, संशोधन तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या एकूण ९८ विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला आमदार सुरेश (राजूमामा) दामू भोळे, नगरसेविका सौ. सुरेखा नितीन तायडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपशिक्षणाधिकारी यशवंतराव ठोसरे यांनी स्थान भूषविले.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सुरेश दामू भोळे म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक यशावर न थांबता देशाच्या विकासासाठी कटिबद्ध राहावे. उच्च शिक्षण घेऊन राष्ट्राच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणे ही आजच्या तरुणांची जबाबदारी आहे.”
प्रमुख वक्ते मा. निळकंठराव गायकवाड (माजी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव) यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना सांगितले की, “यश मिळविण्यासाठी ध्येय निश्चित करून सातत्याने मेहनत घेणे आवश्यक आहे. छोट्या यशाने हुरळून न जाता जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर मोठी स्वप्ने पूर्ण करता येतात.” त्यांनी विविध प्रेरणादायी अनुभव, बोधकथा आणि जीवनमूल्ये सांगून विद्यार्थी व पालकांशी मनमोकळा संवाद साधला.
डॉ. राजेंद्र बाविस्कर (सेवानिवृत्त मुख्य अभियंता, दीपनगर) यांनी समाजातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रशासनातील उच्च पदे, उद्योग, व्यवसाय आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर गुरु रविदास क्लबचे अध्यक्ष डॉ. सुनील सूर्यवंशी, सचिव प्रदीप शेकोकार, डॉ. संदीप भारुळे, सौ. ज्योती निंभोरे, प्रा. स्मिता जयकर, प्रा. विठ्ठलराव सावकारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनील सूर्यवंशी यांनी केले. प्रा. गणेश सूर्यवंशी व गजानन दांडगे यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले. गुणवंत विद्यार्थ्यांची यादी प्रा. संजय सूर्यवंशी, संजय निंभोरे व सौ. प्रतिभा बाविस्कर यांनी वाचून दाखविली. प्रदीप शेकोकार यांनी आभार मानले.
विशेष म्हणजे हा संपूर्ण उपक्रम लोकवर्गणीतून यशस्वीपणे पार पडला. समाजातील शिक्षणप्रेमी, दानशूर नागरिक व कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रमाला मोठे यश मिळाले.
कार्यक्रमाच्या यशासाठी अनेक कार्यकर्त्यांचे योगदान
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. सुनील सूर्यवंशी, प्रदीप शेकोकार, संजय बाविस्कर, रवी नेटके, प्रा. संजय सूर्यवंशी, डी. डी. ठोसरे, सौ. ज्योतीताई निंभोरे, गजानन दांडगे, प्रा. संदीप शेकोकार, प्रा. गणेश सूर्यवंशी, डॉ. संजय भटकर, खंडूजी पवार, कैलास विसावे, डॉ. सुनील निंभोरे, युवराज घोलाणे, कैलास वाघ, नामदेव तायडे, दिलीप सुरवाडे, कैलास सोनवणे, जगन्नाथ निंभोरे, दिलीप दांडगे, निवृत्ती सूर्यवंशी, संजय निंभोरे, प्रा. आत्माराम चिमकर, प्रा. माणिक बागले, गणेश राऊत, अरुण नेटके, सुनील वानखेडे, अशोक लोखंडे, अनिल वानखेडे यांच्यासह डॉ. संपतराव वानखेडे, डॉ. सुरेंद्र सुरवाडे, डॉ. कैलास वाघ, डॉ. गणेश भारुडे, डॉ. सुनील तायडे, डॉ. दिलीप जयकर, डॉ. प्रकाश सुरवाडे, केशव ठोसरे, सोपान भवरे, स्वप्निल ठोसर, संतोष चंदनकर, शांताराम गव्हाळे, डी. ए. सोनवणे, रवींद्र देवरे, सुधाकर मोरे, दीपक अहिरे, प्रशांत निंभोरकर, संजय भारुडे, रामलाल ब्राह्मणे, अमोल बाविस्कर, पुरुषोत्तम चिमणकर, नितीन दांडगे, निलेश गोरे, दशरथ देशमाने, मंगल रेघे, देविदास खैरनार, अशोराज तायडे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, समाजबांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

