जळगावात जागतिक शास्त्रज्ञांचा गौरव सोहळा उत्साहात,  स्वतःतील क्षमता ओळखा; इतरांच्या प्रभावाने करिअर निवडू नका – डॉ. नानासाहेब थोरात
1 min read

जळगावात जागतिक शास्त्रज्ञांचा गौरव सोहळा उत्साहात, स्वतःतील क्षमता ओळखा; इतरांच्या प्रभावाने करिअर निवडू नका – डॉ. नानासाहेब थोरात

Loading

जळगावात जागतिक शास्त्रज्ञांचा गौरव सोहळा उत्साहात

स्वतःतील क्षमता ओळखा; इतरांच्या प्रभावाने करिअर निवडू नका – डॉ. नानासाहेब थोरात

जळगांव प्रतिनिधी

“स्वतःतील क्षमता ओळखा आणि त्यानुसार आयुष्याचा मार्ग निवडा. इतरांच्या प्रभावाने किंवा सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्सना पाहून करिअर ठरवू नका,” असा मोलाचा सल्ला ऑक्सफर्ड विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक डॉ. नानासाहेब थोरात यांनी विद्यार्थ्यांना दिला.

नोबेल फाउंडेशन, जळगाव, कंटेंट ओशन इन्फोटेक प्रा. लि. आणि सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जागतिक शास्त्रज्ञांचा गौरव सोहळा व प्रेरणादायी व्याख्यान’ कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. जळगावात प्रथमच एकाच व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक शास्त्रज्ञ उपस्थित राहिल्याने हा कार्यक्रम विशेष ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून जागतिक स्तरावरील अव्वल ५ टक्के शास्त्रज्ञांमध्ये समावेश असलेले डॉ. डी. जी. हुंडिवाले, डॉ. रत्नमाला बेंद्रे, डॉ. विकास गीते, ग्लोबल मिशन स्कूलचे एस . जे. पाटील, नोबेल फाउंडेशनचे जयदीप पाटील तसेच कंटेंट ओशनचे डॉ.युवराज परदेशी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना डॉ. थोरात यांनी आपल्या सातारा जिल्ह्यातील मायणी या छोट्याशा गावापासून ऑक्सफर्ड विद्यापीठापर्यंतच्या प्रेरणादायी प्रवासाचा उलगडा केला. त्यांनी सांगितले की, आजच्या ‘जेन-झी’ पिढीवर सोशल मीडिया आणि इन्फ्लुएन्सर्सचा मोठा प्रभाव आहे. मात्र इतरांच्या यशाशी स्वतःची तुलना करून आयुष्य दुःखी करू नका. प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळी क्षमता दडलेली असते. ती ओळखा, तिचा सातत्याने विकास करा आणि त्याच दिशेने करिअर घडवा.
भारतामध्ये संशोधन क्षेत्रात प्रचंड संधी असूनही संशोधनाला पोषक सामाजिक आणि शैक्षणिक वातावरण अद्याप पुरेसे निर्माण झालेले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय लावून ज्ञानसंपन्न होण्याचे आवाहन करत, शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात पुस्तकांशी मैत्री केल्यास संयम, शिस्त आणि आत्मविश्वास विकसित होतो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. डी. जी. हुंडिवाले, डॉ. रत्नमाला बेंद्रे आणि डॉ. विकास गीते यांनीही आपल्या संशोधन कार्याची माहिती देत विद्यार्थ्यांना विज्ञान व संशोधन क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित केले.

कार्यक्रमात डॉ. युवराज परदेशी लिखित ‘आउट ऑफ बॉक्स – २’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी नोबेल फाउंडेशनच्या यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला

अध्यक्षीय मनोगतात डॉ. के. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले. “लहान-मोठ्या अपयशांना घाबरू नका. नकारात्मक परिस्थितीला सकारात्मकतेत बदलण्याचा प्रयत्न करा. पुस्तकांइतका चांगला मित्र दुसरा नाही,” असे ते म्हणाले.
प्रास्ताविकात जयदीप पाटील यांनी नोबेल फाउंडेशनच्या कार्याचा व कार्यक्रमाच्या उद्देशाचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश घोंगे यांनी केले, तर आभार जयदीप पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *