कर्करोगाशी झुंज देत लोकसेवेचा अखंड ध्यास; खासदार स्मिताताई वाघ यांना दुसऱ्यांदा “संसद रत्न” पुरस्कार संघर्ष, जिद्द आणि जनसेवेच्या कार्याला देशपातळीवर मानाचा मुजरा
![]()
कर्करोगाशी झुंज देत लोकसेवेचा अखंड ध्यास; खासदार स्मिताताई वाघ यांना दुसऱ्यांदा “संसद रत्न” पुरस्कार
संघर्ष, जिद्द आणि जनसेवेच्या कार्याला देशपातळीवर मानाचा मुजरा
अमळनेर प्रतिनिधी
जळगाव लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार स्मिताताई वाघ यांनी आपल्या कर्तृत्व, जिद्द आणि निस्वार्थ लोकसेवेच्या बळावर जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजच्या काळात राजकारणाकडे अनेकदा टीकेच्या नजरेने पाहिले जाते; मात्र काही व्यक्तिमत्त्वे आपल्या कार्यातून लोकांचा विश्वास पुन्हा दृढ करतात. स्मिताताई वाघ यांचे व्यक्तिमत्त्व त्यापैकीच एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत असतानाही त्यांनी लोकसेवेचा ध्यास कधीच सोडला नाही. शरीर वेदनांनी त्रस्त होते, उपचार सुरू होते, अनेकदा रुग्णालय आणि संसद यांच्यातील प्रवास करावा लागत होता; मात्र जनतेसाठी काम करण्याची त्यांची जिद्द आणि इच्छाशक्ती अखंडपणे कार्यरत होती. संसदेत जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवताना, विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करताना त्यांनी स्वतःच्या वेदनांवर मात केली.
त्यांच्या या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाने हजारो महिलांना तसेच कर्करोगाशी लढणाऱ्या रुग्णांना नवी उभारी दिली आहे. लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ पद नसून जनतेच्या आशा-अपेक्षांची जबाबदारी असते, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले.
त्यांच्या उल्लेखनीय संसदीय कार्याची दखल घेत त्यांना सलग दुसऱ्यांदा प्रतिष्ठेच्या “संसद रत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा केवळ त्यांचा वैयक्तिक सन्मान नसून संघर्ष, प्रामाणिकपणा, सेवाभाव आणि कर्तव्यनिष्ठेचा गौरव मानला जात आहे.
कर्करोगाने त्यांच्या शरीराला त्रास दिला असेल, पण त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीसमोर संकटांनाही माघार घ्यावी लागली. संकटांसमोर न झुकता आपल्या कर्तव्याच्या मार्गावर ठामपणे चालणारा खरा योद्धा कोण असतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
त्यांच्या कार्याकडे पाहताना अनेकांच्या डोळ्यांत अभिमानाने अश्रू दाटून येतात. संघर्षातून उभी राहिलेली ही महिला खासदार आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. त्यांचा जीवनप्रवास एकच संदेश देतो — परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, सेवाभाव आणि कर्तव्यनिष्ठा असेल तर कोणतीही लढाई जिंकता येते.
यावेळी भाजपा युवा मोर्चा जानवे मंडळ अध्यक्ष श्री. हिरालाल पाटील तसेच भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

