अमळनेरात ‘स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे’ महानाट्य दिमाखात संपन्न ,250 कलाकारांनी जिवंत केला इतिहास; जयनिल फाऊंडेशनचा थाटात शुभारंभ, संभाजी महाराजांच्या अखेरच्या प्रसंगाने प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू; घोषणांनी नाट्यगृह दणाणले
![]()
अमळनेरात ‘स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे’ महानाट्य दिमाखात संपन्न
250 कलाकारांनी जिवंत केला इतिहास; जयनिल फाऊंडेशनचा थाटात शुभारंभ
संभाजी महाराजांच्या अखेरच्या प्रसंगाने प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू; घोषणांनी नाट्यगृह दणाणले
अमळनेर प्रतिनिधी :
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सादर करण्यात आलेले “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे” हे भव्य महानाट्य प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात दिमाखात संपन्न झाले. संस्कृती फाऊंडेशन व जयनिल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महानाट्याचे दोन्ही प्रयोग हाऊसफुल वातावरणात पार पडले.
यावेळी इतिहासातील शौर्य, त्याग आणि धर्मरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची जिवंत अनुभूती प्रेक्षकांना मिळाली. नाट्यगृहात “जय भवानी, जय शिवाजी” आणि “धर्मवीर संभाजी महाराज की जय”च्या घोषणांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले होते.
—
युवकांसाठी विशेष प्रयोग; जयनिल फाऊंडेशनचा शुभारंभ
जयनिल फाऊंडेशनच्या वतीने सकाळी 10 वाजता महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी स्वतंत्र प्रयोग आयोजित करण्यात आला होता. याच वेळी प.पू. संत प्रसाद महाराज यांच्या शुभहस्ते जयनिल फाऊंडेशनच्या लोगोचे अनावरण करून फाऊंडेशनचा थाटात शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार स्मिताताई वाघ होत्या. यावेळी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, माजी नगराध्यक्षा सौ. जयश्री अनिल पाटील, लोकनियुक्त सरपंच श्रीमती राजश्री राजेश पाटील, खा. शि. मंडळाचे कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल, कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, जितेंद्र ठाकूर,राष्ट्रवादी ग्रंथालय सेलच्या प्रदेश पदाधिकारी रिताताई बाविस्कर ,जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील व उपाध्यक्ष वरुण राजश्री पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संत प्रसाद महाराज यांनी आशीर्वचन देत समाजकार्यासाठी युवकांनी पुढे येण्याचे आवाहन केले. खासदार स्मिताताई वाघ व आमदार अनिल पाटील यांनी जयनिल फाऊंडेशनच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
—


“तरुणाईला केंद्रस्थानी ठेवून काम करणार” – गौतम पाटील
जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम पाटील यांनी सांगितले की,
“छत्रपती संभाजी महाराज हे तरुणाईचे प्रेरणास्थान आहेत. युवकांना इतिहासाची जाणीव व्हावी आणि त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून विशेष प्रयोग आयोजित करण्यात आला. शिक्षण, आरोग्य, शेती, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार असून तरुणाईला केंद्रबिंदू मानून काम केले जाईल.”
तर संस्कृती फाऊंडेशनचे निकेश राजपूत यांनी महानाट्याच्या आयोजनासाठी पाठबळ दिल्याबद्दल आमदार अनिल पाटील व जयनिल फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले.
—
250 कलाकारांनी साकारला जिवंत इतिहास
या भव्य महानाट्यात तब्बल 250 कलाकारांनी विविध भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे यातील 80 टक्क्यांहून अधिक कलाकार अमळनेरचे होते. स्थानिक कलाकारांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न संस्कृती फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आला.
कलाकारांच्या प्रभावी अभिनयामुळे संपूर्ण कथानक प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर जिवंत उभे राहिले. युद्धप्रसंग, संवाद, प्रकाशयोजना आणि संगीत यामुळे प्रत्येक प्रसंग रोमांचकारी ठरत होता. अनेक प्रसंगांनी प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणले, तर संभाजी महाराजांच्या अखेरच्या प्रसंगाने उपस्थितांचे डोळे पाणावले.
कार्यक्रमाच्या शेवटी संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांसमोर अनेक प्रेक्षक नतमस्तक झाले. संस्कृती फाऊंडेशन आणि जयनिल फाऊंडेशनचे आभार मानत नागरिक भारावलेल्या वातावरणात सभागृहातून बाहेर पडले.


