डॉ. सौ. संगीताताई शिंदे (बोंडे) यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!  ग्रामीण शाळांना दिलासा; ९ वी-१० वीची एकत्रित पटसंख्या २० असली तरी ३ शिक्षक पदांना मंजुरी  शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पाळला दिलेला शब्द; 2026-27 संचमान्यतेसाठी विशेष सवलतीची घोषणा
1 min read

डॉ. सौ. संगीताताई शिंदे (बोंडे) यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! ग्रामीण शाळांना दिलासा; ९ वी-१० वीची एकत्रित पटसंख्या २० असली तरी ३ शिक्षक पदांना मंजुरी शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पाळला दिलेला शब्द; 2026-27 संचमान्यतेसाठी विशेष सवलतीची घोषणा

Loading

डॉ. सौ. संगीताताई शिंदे (बोंडे) यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!

ग्रामीण शाळांना दिलासा; ९ वी-१० वीची एकत्रित पटसंख्या २० असली तरी ३ शिक्षक पदांना मंजुरी

शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पाळला दिलेला शब्द; 2026-27 संचमान्यतेसाठी विशेष सवलतीची घोषणा

अमरावती, दि. १२ मे :
ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांसाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय शासनाने जाहीर केला असून, शैक्षणिक सत्र 2026-27 करीता संचमान्यतेचे निकष शिथिल करण्यात आले आहेत. आता इयत्ता ९ वी व १० वीची एकत्रित पटसंख्या केवळ २० किंवा त्यापेक्षा अधिक असली तरी संबंधित शाळांना तब्बल ३ शिक्षक पदांना मंजुरी मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील हजारो शाळांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या डॉ. सौ. संगीताताई शिंदे (बोंडे) यांनी शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर तसेच शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे विशेष आभार मानले आहेत. शासन निर्णय दि. १५ मार्च २०२४ नुसार ही विशेष सवलत 2025-26 च्या संचमान्यतेवेळी लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

बैठकीत मांडला होता ज्वलंत प्रश्न

दि. २९ एप्रिल रोजी शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या दालनात राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान डॉ. सौ. संगीताताई शिंदे (बोंडे) यांनी ग्रामीण भागातील शाळांच्या संचमान्यतेचा मुद्दा प्रभावीपणे उपस्थित केला होता. कमी पटसंख्येमुळे शिक्षक पदे कमी होऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याची बाब त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली.

या बैठकीस शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रशमजी कोल्हे, प्रदेश सहसंयोजक पदमाकर घोगरे, सिनेट सदस्य तथा अमरावती विभाग सहसंयोजक अमोल ठाकरे, संस्थाध्यक्ष शुभम वानखडे, रणजीत पावडे, सुकाणू समिती सदस्य रमेशजी देशपांडे, तसेच शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त, उपसचिव, शिक्षण संचालक व शिक्षण उपसंचालक उपस्थित होते.

शब्द दिला आणि पाळलाही!

बैठकीत शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी ग्रामीण भागातील शाळांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता शिक्षण उपसचिवांकडून अधिकृत पत्र निर्गमित करण्यात आले असून, राज्यमंत्र्यांनी दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरवल्याबद्दल शिक्षक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला नवे बळ

या निर्णयामुळे कमी पटसंख्या असलेल्या ग्रामीण शाळांमधील शिक्षक कपातीचा धोका टळणार असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे. विशेषतः दुर्गम व आदिवासी भागातील शाळांसाठी हा निर्णय आशेचा किरण ठरत आहे. शिक्षक संघटनांनीही या निर्णयाचे स्वागत करत शासनाचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *