“एका कुटुंबाला मिळाला जगण्याचा आधार” शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रयत्नातून संदीप सैनदानशिव यांना शालार्थ आयडी मंजूर; संघर्षाला मिळाला न्याय
![]()
“एका कुटुंबाला मिळाला जगण्याचा आधार”
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रयत्नातून संदीप सैनदानशिव यांना शालार्थ आयडी मंजूर; संघर्षाला मिळाला न्याय
मुंबई प्रतिनिधी
कधी कधी एखाद्या शासकीय निर्णयामागे फक्त कागदपत्रांचा प्रवास नसतो, तर एका संपूर्ण कुटुंबाच्या जगण्याची लढाई दडलेली असते. नेरळ विद्या मंदिर, नेरळ ता. कर्जत, जि. रायगड येथील शिपाई श्री. संदीप बुधा सैनदानशिव यांच्या आयुष्यातील संघर्षमय प्रवासाला अखेर न्याय मिळाला असून, अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर त्यांना शालार्थ आयडी मंजूर करण्यात आला आहे.
सन १९९५ मध्ये श्री. संदीप सैनदानशिव यांचे वडील कै. बुधा सैनदानशिव बेपत्ता झाले होते. त्यानंतर शासनाने सन २०१० मध्ये त्यांना मृत घोषित केले. घरातील कर्ता पुरुष हरपल्यानंतर संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आर्थिक संकट, भविष्याची चिंता आणि शासनाच्या दालनात अडकलेली पेन्शन केस अशा अनेक अडचणींनी कुटुंबाला वेढले होते.
अशा कठीण परिस्थितीत विद्या मंदिर मंडळ, माहीम संस्थेने मानवतेचा हात पुढे करत श्री. संदीप सैनदानशिव यांना अनुकंपा तत्वावर त्यांच्या वडिलांच्या जागी नोकरी दिली. मात्र, शासकीय मान्यता मिळवणे हा अत्यंत कठीण प्रवास ठरला. जिल्हा परिषद कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या, प्रक्रियेतील अडथळे आणि शासनाच्या कामकाजाची अपुरी माहिती यामुळे निराशा वाढत होती.
यावेळी विद्या मंदिर मंडळाचे संयुक्त सचिव श्री. विवेकजी पोतदार, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे कर्जत तालुका सल्लागार श्री. प्रमोद विचवे आणि कार्यकर्ते श्री. हनुमंत भगत यांनी ही बाब कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या निदर्शनास आणून दिली.
माननीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालत शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद रायगड यांच्याशी थेट संपर्क साधला. “अनुकंपा तत्वावरील नियुक्तीला तात्काळ मान्यता मिळाली पाहिजे,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे शिक्षणाधिकारी मा. श्री. महारुद्र नाळे साहेब यांनी कोणताही विलंब न करता संदीप सैनदानशिव यांच्या नियुक्तीस मान्यता दिली.
मात्र संघर्ष इथेच थांबला नाही. शालार्थ आयडीअभावी वेतन मिळत नव्हते. संस्थेने प्रस्ताव सादर करूनही तब्बल एक वर्ष विविध त्रुटींमुळे प्रकरण रखडले होते. अखेर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पुन्हा स्वतः लक्ष घालत आज दि. १० मे २०२६ रोजी श्री. संदीप सैनदानशिव यांना शालार्थ आयडी आदेश सुपूर्द केला आणि एका कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न मार्गी लावला.
भावुक होत श्री. संदीप सैनदानशिव यांनी, “आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचे ऋण आम्ही कधीच फेडू शकत नाही,” अशी भावना व्यक्त केली.
या संपूर्ण प्रक्रियेत सहकार्य करणारे कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे, शिक्षणाधिकारी माध्यमिक मा. महारुद्र नाळे साहेब, शिक्षण उपसंचालक श्री. राजेश कंकाळ साहेब, संस्थेचे संयुक्त सचिव श्री. विवेकजी पोतदार तसेच सातत्याने पाठपुरावा करणारे प्राचार्य श्री. प्रमोद विचवे यांचे सैनदानशिव कुटुंबीयांनी मनःपूर्वक आभार मानले.

