अमळनेर शेतकी संघाच्या रणांगणात काँग्रेसची जोरदार एन्ट्री ; शेतकरी पॅनल सज्ज ,उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी वाढली ; समविचारी पक्षांशीही चर्चेला वेग
![]()
अमळनेर शेतकी संघाच्या रणांगणात काँग्रेसची जोरदार एन्ट्री ; शेतकरी पॅनल सज्ज
उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी वाढली ; समविचारी पक्षांशीही चर्चेला वेग
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर तालुका शेतकी संघाच्या आगामी निवडणुकीचे राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागले असून, उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व विविध राजकीय गटांमध्ये सध्या जोरदार चर्चा रंगत असून, तालुक्याच्या राजकारणात शेतकी संघ निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षानेही या निवडणुकीत दमदार ताकदीनिशी उतरण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते धनगर अण्णा पाटील यांनी “काँग्रेसचे शेतकरी पॅनल निवडणूक लढवण्यासाठी पूर्णपणे सज्ज असून, संघाच्या सत्तेवर शेतकऱ्यांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आम्ही मैदानात उतरत आहोत,” असे स्पष्ट केले.
निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी विशेष सुकाणू समिती स्थापन करण्यात आली असून, समितीच्या अध्यक्षपदी धनगर दला पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत काँग्रेसमधील अनुभवी व प्रभावी पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
समितीमध्ये तालुकाध्यक्ष बि. के. सूर्यवंशी, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पीरन पाटील, अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रा. सुभाष पाटील, माजी तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे यांचा समावेश असून, प्रा. श्याम पवार यांच्याकडे समितीचे समन्वयक पद सोपविण्यात आले आहे.
यावेळी सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “शेतकरी हिताला प्राधान्य देणाऱ्या समविचारी पक्षांशीही सकारात्मक चर्चा सुरू असून, आगामी काळात त्यांच्याही उमेदवारांचा पॅनलमध्ये समावेश करण्यात येणार आहे.”
अमळनेर तालुक्यातील शेतकरी राजकारणाला नवे वळण देणारी ही निवडणूक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. काँग्रेसच्या हालचालींमुळे शेतकी संघाच्या निवडणुकीत आता रंगत आणखी वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे.

