एटीएमच्या जंजाळात अडकलेले शेतकरी; जिल्हा बँकेच्या मनमानीवर संतापाचा उद्रेक! , रोखीऐवजी एटीएममधून कर्जवाटपाचा हट्ट; आठवडाभर फिरूनही शेतकरी रिकाम्या हाताने परत
![]()
एटीएमच्या जंजाळात अडकलेले शेतकरी; जिल्हा बँकेच्या मनमानीवर संतापाचा उद्रेक!
रोखीऐवजी एटीएममधून कर्जवाटपाचा हट्ट; आठवडाभर फिरूनही शेतकरी रिकाम्या हाताने परत
अमळनेर (प्रतिनिधी) :
जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी मार्च महिन्यात अक्षरशः पोटाला चिमटा देत रोखीने पीक कर्जाची परतफेड केली. मात्र आता कर्जवाटपाची वेळ येताच त्याच शेतकऱ्यांना एटीएमच्या जाचात अडकवून आर्थिक व मानसिक छळ केला जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
जिल्हा बँकेकडून नेहमीप्रमाणेच कर्जवाटप फक्त एटीएममार्फतच करण्यात येत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. अनेक वेळा शेतकऱ्यांनी रोखीने किंवा शाखांतील मायक्रो एटीएमद्वारे कर्जवाटप करण्याची मागणी केली असतानाही बँकेची मनमानी सुरूच असल्याचे चित्र आहे.
गेल्या आठवड्याभरापासून शेतकरी एटीएम कार्ड हातात घेऊन गावोगाव फिरत आहेत. मात्र एटीएममध्ये रोकडच उपलब्ध नसल्याने दिवसभर हेलपाटे मारूनही त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. एवढेच नव्हे तर पैसे काढण्यासाठी सोबत “जानकार” व्यक्ती नेण्याची वेळ येत असून त्यासाठी अतिरिक्त खर्चही शेतकऱ्यांच्या माथी मारला जात आहे.
दरवर्षी हा प्रश्न निर्माण होत असतानाही ना बँक प्रशासन, ना संचालक मंडळ, ना जिल्हा प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत असल्याची टीका होत आहे. याबाबत किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक (LDM) सुनील देव्हारा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी “जिल्ह्यात पुरेशी रोकड उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच मार्ग काढला जाईल,” असे आश्वासन दिले आहे. तसेच काही प्रमाणात रोखीने कर्जवाटप करण्याबाबतही सकारात्मक संकेत देण्यात आले आहेत.
परंतु, लग्नसराईच्या तोंडावर अनेक शेतकरी कुटुंबांना तातडीने पैशांची गरज असताना ही दिरंगाई असह्य ठरत आहे. त्यामुळे बँकेने तात्काळ किमान अर्धे कर्ज रोखीने देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
⚠️ इशारा स्पष्ट!
“शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. तात्काळ मार्ग काढा, अन्यथा किसान काँग्रेसच्या वतीने जिल्हा बँकेवर तीव्र मोर्चा काढण्यात येईल,” असा थेट इशारा प्रा. सुभाष पाटील यांनी दिला आहे.
👉 एकीकडे कर्जफेडीसाठी शेतकरी वेळेवर पैसे भरतो, तर दुसरीकडे त्यालाच स्वतःच्या पैशासाठी एटीएमपुढे रांगा लावाव्या लागतात—हीच का बँकिंग व्यवस्था? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य शेतकरी विचारत आहे.



