अंगारकी चतुर्थीला मंगळग्रह मंदिरात भक्तांचा जनसागर उसळला, दुर्मिळ योगामुळे महाराष्ट्रासह देशभरातून भाविकांची मोठी उपस्थिती
![]()
अंगारकी चतुर्थीला मंगळग्रह मंदिरात भक्तांचा जनसागर उसळला
दुर्मिळ योगामुळे महाराष्ट्रासह देशभरातून भाविकांची मोठी उपस्थिती
अमळनेर (प्रतिनिधी) : अंगारक संकष्ट चतुर्थीच्या पवित्र निमित्ताने येथील श्री मंगळग्रह मंदिर मंगळवार, दि. 5 मे रोजी भाविकांच्या प्रचंड गर्दीने अक्षरशः फुलून गेले. यंदा 2026 मधील द्वितीय अंगारक योग दुर्मिळ आणि अत्यंत शुभ मानला जात असल्याने महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतून भाविकांनी मोठ्या श्रद्धेने मंदिरात हजेरी लावली.
संकष्टी चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व असून, ती मंगळवारी आल्यास तिला ‘अंगारकी चतुर्थी’ असे संबोधले जाते. यंदाचा हा दुर्मिळ योग साधण्यासाठी अनेक भाविक सोमवार, दि. 4 मे रोजी रात्रीपासूनच मंदिरात दाखल झाले होते. पहाटे 5.25 वाजता चतुर्थी प्रारंभ होताच मंदिर परिसर फुलांच्या आकर्षक सजावटीने नटलेला दिसून आला.
पहाटेच्या मंगल मुहूर्तावर श्री गणपती बाप्पा, पंचमुखी हनुमानजी आणि श्री मंगळग्रह देवतेचे यजमानांच्या हस्ते विधिवत विशेष पूजन करण्यात आले. त्यानंतर भाविकांनी श्री गुरुदत्त भगवान, श्री अनघालक्ष्मी माता, श्री कालभैरवनाथ, श्री माता भैरवी, श्री स्वामी समर्थ महाराज तसेच मंगळेश्वर महादेवांचे दर्शन घेऊन भक्तिभाव व्यक्त केला.
ही चतुर्थी बुधवार, दि. 6 मे रोजी सकाळी 7.51 वाजेपर्यंत असल्याने ‘अहोरात्र अंगारकी’ मानली गेली. यंदा शिवयोग आणि बुधादित्य योग एकत्र आल्याने या दिवसाचे धार्मिक महत्त्व अधिक वाढले. रात्री 10.35 वाजता चंद्रोदय झाल्यानंतर भाविकांनी चंद्राला अर्घ्य अर्पण करून उपवास सोडल्याचे चित्र दिसून आले.
काय आहे अंगारकी चतुर्थीचे महत्त्व?
स्कंद पुराणानुसार अंगारकांनी गणपती बाप्पांची कठोर तपश्चर्या केल्यावर प्रसन्न होऊन बाप्पांनी मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला ‘अंगारकी’ असे नाव दिले. या दिवशी व्रत केल्यास कर्जमुक्ती, आत्मविश्वास वृद्धी आणि अडथळे दूर होतात, अशी श्रद्धा आहे. भाविकांनी या दिवशी 21 दुर्वा व मोदकांचा नैवेद्य अर्पण करून चंद्रदर्शनानंतर उपवास सोडण्याची परंपरा आहे.
यंदा तीन अंगारकी चतुर्थी
2026 या वर्षात योगायोगाने तीन अंगारकी चतुर्थी येत आहेत. पहिली 6 जानेवारी रोजी पार पडली, दुसरी 5 मे रोजी झाली असून तिसरी 29 सप्टेंबर 2026 रोजी येणार आहे. पंचांगानुसार ग्रह-नक्षत्रांची विशेष स्थिती आणि मंगळवार-चतुर्थीचा योगायोग यामुळे हा दुर्मिळ संयोग जुळून आला आहे.

