जिद्दीच्या ज्वालेतून घडलेलं नेतृत्व — तात्यासाहेब विलासराव पाटील”
1 min read

जिद्दीच्या ज्वालेतून घडलेलं नेतृत्व — तात्यासाहेब विलासराव पाटील”

Loading

“जिद्दीच्या ज्वालेतून घडलेलं नेतृत्व — तात्यासाहेब विलासराव पाटील”

अमळनेर प्रतिनिधी
ज्ञान माणसाला मोठं करतं, पण त्या ज्ञानाला जर संस्कारांची, संवेदनांची आणि माणुसकीची जोड मिळाली, तरच त्या व्यक्तिमत्त्वातून समाजाला दिशा देणारा प्रकाश निर्माण होतो. अशा तेजस्वी, विचारवंत आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचे जिवंत उदाहरण म्हणजे देवगाव-देवळी हायस्कूलचे अध्यक्ष तात्यासो. विलासरावजी पाटील.
धैर्य, अथक परिश्रम, सत्यनिष्ठा, तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचा अखंड झरा—या सर्व गुणांना प्रेमळ, साधा आणि प्रसन्न स्वभावाची जोड लाभली की जे व्यक्तिमत्त्व घडते, ते म्हणजे तात्यासाहेब. कोणतीही परिस्थिती असो, चेहऱ्यावरचं हसू आणि मनातली सकारात्मकता कधीच ढळू न देणारी त्यांची वृत्ती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते.
त्यांच्या घरातील वातावरणच शिक्षण आणि संस्कारांनी समृद्ध होतं. आई सौ. मंदाकिनी पाटील या राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्या असल्याने त्यांच्याकडून शिस्त, समाजसेवा आणि कर्तव्यनिष्ठा यांचे धडे लहानपणापासूनच मिळाले. या संस्कारांचीच फळं पुढे त्यांच्या प्रत्येक कार्यात दिसून येतात. आपली कन्या विशाखा पाटील हिच्या स्वप्नांना त्यांनी केवळ पाठिंबा दिला नाही, तर ती स्वप्नं साकार करण्यासाठी भक्कम आधार दिला. आज विशाखा ही कुटुंबातील पहिली फॅशन डिझायनर बनून आपल्या कर्तृत्वाची वेगळी ओळख निर्माण केली.
सामाजिक भान जपणाऱ्या तात्यासाहेबांनी 2011 च्या जनगणना मोहिमेदरम्यान ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी, यासाठी राज्यभर जनजागृती केली. पंतप्रधानांना 5000 पोस्टकार्ड पाठवून त्यांनी या मागणीला राष्ट्रीय पातळीवर पोहोचवले. त्यांच्या सातत्यपूर्ण लढ्याला यश मिळत आज केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेला मंजुरी दिली, ही त्यांच्या कार्याची मोठी पावतीच म्हणावी लागेल.
ओबीसी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी त्यांनी वेळोवेळी संघर्ष उभा केला. 27% आरक्षणासाठी झालेल्या कायदेशीर लढ्यात त्यांनी सह्यांची मोहीम राबवून हजारो विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला. शैक्षणिक कर्जासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील 700 हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ झाला. धुळे जिल्ह्यातील बिंदू नामावलीतील त्रुटी त्यांनी उघडकीस आणत दशकभर ठप्प असलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यास भाग पाडले—ही त्यांची जिद्द आणि प्रामाणिकपणाची साक्ष आहे.
अखिल भारतीय माळी महासंघाच्या माध्यमातून त्यांनी समाजसंघटन, वधू-वर परिचय मेळावे, रक्तगट तपासणी, वृक्षारोपण आणि सामाजिक प्रबोधनाचे अनेक उपक्रम राबवले. महात्मा फुले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी देवगाव-देवळी सारख्या छोट्याशा गावात दहावीपर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. आज या शाळेतून घडलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत, हीच त्यांच्या कार्याची खरी कमाई आहे.
सावित्रीबाई फुले वाचनालयाच्या स्थापनेद्वारे त्यांनी वाचन संस्कृती जपली, तर “गुरु गौरव” पुरस्कारांच्या माध्यमातून खानदेशातील 2000 हून अधिक गुणवंत शिक्षकांचा सन्मान करून शिक्षणक्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला. उत्कृष्ट वक्ते म्हणूनही त्यांनी अनेक विषयांवर समाजाला दिशा देणारी भाषणं केली आहेत.
त्यांच्या जीवनप्रवासात कै. संभाजी पगारे यांचे मार्गदर्शनही अत्यंत मोलाचे ठरले.
३ मे रोजी त्यांच्या ६२व्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या कार्याला आणि व्यक्तिमत्त्वाला सन्मानपूर्वक अभिवादन—

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट,
काही कधीच लक्षात न राहणारे,
आणि काही कायमचे मनात घर करणारे…
मनात घर करणारी जी अनेक माणसं,
जगताना लाभली त्यातले एक तुम्ही…!
आपल्या कार्यातून समाजाला दिशा देणाऱ्या या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

– शुभेच्छुक
श्री ईश्वर आर. महाजन (पत्रकार)
उपशिक्षक, महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल, देवगाव (ता. अमळनेर, जि. जळगाव)
मो. 9860352960

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *