जागतिक स्तरावर प्रेस स्वातंत्र्याबाबत गंभीर चिंता; भारतामधील परिस्थिती अत्यंत गंभीर, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे महत्वपूर्ण पाऊल ‘पत्रकारिता संपुष्टात येण्याची भीती’ – संदीप काळे
![]()
जागतिक स्तरावर प्रेस स्वातंत्र्याबाबत गंभीर चिंता;
भारतामधील परिस्थिती अत्यंत गंभीर, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे महत्वपूर्ण पाऊल
‘पत्रकारिता संपुष्टात येण्याची भीती’ – संदीप काळे
नवी दिल्ली : जागतिक स्तरावर प्रेस स्वातंत्र्याच्या घसरत्या स्थितीचा तीव्र निषेध व्यक्त करत, समाजातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांवर गंभीर संकट ओढवले आहे. पत्रकारांवरील वाढते हल्ले, अटकसत्रे आणि सेन्सॉरशिपमुळे केवळ माध्यमेच नव्हे, तर समाजातील सत्य मांडण्याची शक्तीही कमकुवत होत चालली आहे. त्यामुळे ही परिस्थिती केवळ पत्रकारितेपुरती मर्यादित नसून संपूर्ण लोकशाही व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याची तीव्र सामाजिक चिंता व्यक्त केली जात आहे.
जागतिक पातळीवर जाहीर झालेल्या प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2026 मध्ये जगातील 180 देशांचा समावेश करण्यात आला असून, या अहवालात अनेक देशांमध्ये माध्यम स्वातंत्र्याची स्थिती खालावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. युरोपमधील नॉर्वे (1), डेन्मार्क (2), स्वीडन (3), नेदरलँड्स (4) आणि फिनलंड (5) हे देश अव्वल स्थानी कायम असताना, तळामध्ये उत्तर कोरिया (180), एरिट्रिया (179), इराण (176), अफगाणिस्तान (175) आणि सीरिया (177) या देशांचा समावेश आहे.
या अहवालानुसार भारताचा क्रमांक 161 वर असून मागील वर्षीच्या 159 व्या क्रमांकाच्या तुलनेत घसरण झाल्याचे दिसून येते. दक्षिण आशियामध्ये पाकिस्तान 152 (मागील 150), बांगलादेश 165 (163), श्रीलंका 150 (135) या देशांमध्येही घसरण नोंदवली गेली आहे, तर नेपाळने 95 वरून 90 वर येत काही प्रमाणात सुधारणा दर्शवली आहे. चीनचा क्रमांक 172 वर कायम आहे.
अहवालातील आकडेवारीनुसार जगातील 60 टक्क्यांहून अधिक देशांमध्ये प्रेस स्वातंत्र्याची स्थिती “खराब” किंवा “अत्यंत गंभीर” स्वरूपाची आहे, तर सुमारे 30 देशांमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर श्रेणीत आहे. निर्देशांक तयार करताना राजकीय परिस्थिती, कायदेशीर चौकट, आर्थिक दबाव, सामाजिक-सांस्कृतिक वातावरण आणि पत्रकारांची सुरक्षा या पाच प्रमुख निकषांवर 0 ते 100 गुणांच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर , व्हॉईस ऑफ मीडिया व्ही वो एम इंटरनॅशनल फोरमचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, यांनी या अहवालावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. “जागतिक स्तरावर प्रेस स्वातंत्र्याची घसरलेली स्थिती पाहता पत्रकारिता संपुष्टात येते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. विशेषतः भारतात घडत असलेल्या अलीकडील घटनांमुळे ही चिंता अधिकच वाढली आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, पत्रकारांवरील हल्ले, अटक, कायद्यांचा गैरवापर, डिजिटल सेन्सॉरशिप आणि आर्थिक दबाव यामुळे स्वतंत्र पत्रकारितेवर मोठा परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली पत्रकारिता धोक्यात येत असून, सरकारांनी तातडीने पत्रकार संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
जागतिक स्तरावर माध्यम स्वातंत्र्याचा अभ्यास करणाऱ्या आर एस एफ च्या या अहवालामुळे जगभरातील लोकशाही व्यवस्थांसमोर एक गंभीर इशारा निर्माण झाला असून, वेळेत योग्य पावले उचलली नाहीत तर स्वतंत्र पत्रकारितेचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते.
*प्रेस स्वातंत्र्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे जागतिक पाऊल*
जागतिक स्तरावर प्रेस स्वातंत्र्याच्या घसरत्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर व्हॉईस ऑफ मीडिया, व्ही वो एम इंटरनॅशनल फोरमने ठोस पावले उचलली आहेत. माध्यम स्वातंत्र्य, पत्रकारांची सुरक्षा आणि अभिव्यक्ती हक्क यासाठी विविध देशांमध्ये समन्वय साधत व्यापक मोहीम राबवली जात आहे. या अंतर्गत पत्रकारांवरील हल्ल्यांचा निषेध, आंतरराष्ट्रीय स्तरावर निवेदने सादर करणे, तसेच विविध मानवाधिकार संघटनांशी संवाद वाढवणे यावर भर दिला जात आहे. पत्रकार संरक्षण कायद्यांची मागणी, सुरक्षा यंत्रणा मजबूत करणे आणि स्वतंत्र पत्रकारितेला बळ देण्यासाठी धोरणात्मक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
तसेच, विविध देशांतील पत्रकारांना एकत्र आणून जागतिक नेटवर्क उभारणे, प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करणे आणि डिजिटल माध्यमांतील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी उपाययोजना करणे या दिशेनेही संस्था सक्रिय आहे.
या उपक्रमांमुळे प्रेस स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी जागतिक पातळीवर एक मजबूत आवाज निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून, पत्रकारांच्या हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
जागतिक स्तरावर पत्रकारांच्या हक्कांसाठी कार्यरत व्हॉईस ऑफ मीडिया व्ही वो एम इंटरनॅशनल फोरमच्या माध्यमातून तब्बल ७ लाख ४० हजार पत्रकार एका झेंड्याखाली एकत्र आले आहेत. या एकजुटीमुळे विविध देशांतील पत्रकारांना एक मजबूत व्यासपीठ मिळाले असून, त्यांच्या समस्यांना जागतिक स्तरावर आवाज मिळू लागला आहे.
या नेटवर्कच्या माध्यमातून पत्रकार संरक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सुरक्षित कामकाजाच्या वातावरणासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. विविध देशांतील पत्रकारांमध्ये समन्वय साधून अनुभव, माहिती आणि सहाय्याची देवाणघेवाण केली जात आहे.
ही ऐतिहासिक एकजूट केवळ संघटनात्मक बळ नव्हे, तर जागतिक स्तरावर पत्रकारितेच्या अस्तित्वासाठी आणि स्वातंत्र्यासाठी उभा राहिलेला सामूहिक आवाज असल्याचे मत संदीप काळे यांनी व्यक्त केले आहे.
________________

