अमळनेरमध्ये आदर्श शिक्षकांचा गौरव; दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप , महाराष्ट्र दिनानिमित्त पंचायत समिती शिक्षण विभागाचा भव्य उपक्रम – मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न
![]()
अमळनेरमध्ये आदर्श शिक्षकांचा गौरव; दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
महाराष्ट्र दिनानिमित्त पंचायत समिती शिक्षण विभागाचा भव्य उपक्रम – मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न
अमळनेर प्रतिनिधी :
जिल्हा परिषद जळगाव संचलित पंचायत समिती शिक्षण विभाग, अमळनेर यांच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय कार्यक्रम मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा करण्यात आला. जी.एस. हायस्कूल हॉल येथे आयोजित या कार्यक्रमास माजी मंत्री तथा आमदार दादासाहेब अनिल पाटील व जळगाव लोकसभा खासदार स्मिताताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेला माल्यार्पण व पूजन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मंचावर मुख्याध्यापक प्रतिनिधी श्री बाळासाहेब विनोद कदम, गट शिक्षणाधिकारी श्री प्रमोद पाटील, केंद्र प्रमुख श्री चंद्रकांत पाटील (अमळगाव), श्री रविंद्र पाटील (चिमणपुरी), श्री अशोक सोनवणे (शहापूर) तसेच तालुका क्रीडा अध्यक्ष श्री एस.पी. वाघ उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना गट शिक्षणाधिकारी श्री प्रमोद पाटील यांनी केली. यावेळी सन २०२५-२६ साठी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा शाल, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे पुढीलप्रमाणे :
श्रीमती मनीषा पाटील (जि.प. शाळा सडावण), सौ. सीमा सूर्यवंशी (मुख्याध्यापिका, डी.आर. कन्या), श्रीमती अनीता बोरसे (साने गुरुजी कन्या), श्री भैय्यासाहेब साळुंखे (जि.प. गडखांब), श्रीमती रोहिणी बडगुजर (जि.प. शाळा मुडी), श्रीमती सुवर्णा वाणी (जि.प. शाळा मेहरगाव), श्री प्रभाकर पाटील (जि.प. शाळा चिमणपुरी), श्री अनिल चौधरी (माध्यमिक विद्यालय निम), श्री बापूराव सांगोरे (माध्यमिक आश्रम शाळा रणाईचे), श्री आनंदा धनगर (माध्यमिक शाळा करणखेडा) व श्रीमती शोभा कसबे (डी.आर. कन्या शाळा).
याच कार्यक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पंचायत शिक्षण विभागासह श्री सॅम शिंगाणे, श्री कमलेश मोरे, श्री सुनिल करंदीकर, श्री सचिन वाघ व श्री भूपेंद्र सर यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमामुळे शिक्षकांचा सन्मान व विद्यार्थ्यांप्रती सामाजिक संवेदनशीलता या दोन्ही बाबी अधोरेखित झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

