धरणगावात गुरु – शिष्य जन्मोत्सवनिमित्त वैचारिक प्रबोधन !… तात्यासाहेब व बाबासाहेब यांनी आपल्याला सामाजिक न्याय दिला : शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे .
![]()
धरणगावात गुरु – शिष्य जन्मोत्सवनिमित्त वैचारिक प्रबोधन !…
तात्यासाहेब व बाबासाहेब यांनी आपल्याला सामाजिक न्याय दिला : शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे .
धरणगाव प्रतिनिधी : पी डी पाटील सर
धरणगांव : राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले द्विजन्मशताब्दी वर्ष आणि भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती म्हणजेच महान गुरु-शिष्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मोठा माळी वाडा व लहान माळी वाडा समाज पंच मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मोठा माळी वाडा समाज मढीच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव आर डी महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोठा माळीवाडा समाजाध्यक्ष व्ही टी माळी होते. प्रमुख अतिथी लहान माळीवाडा समाजाध्यक्ष रामकृष्ण महाजन व अमळनेर येथील शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे, एस व्ही आढावे उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रमुख व्याख्याते यांचे शाल – पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी रांगोळी स्पर्धेच्या विजेत्या वैशाली गुलाब महाजन व खुशबु गुलाब महाजन यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले. महात्मा फुले हायस्कूलचे उपशिक्षक एस व्ही आढावे यांनी शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे यांचा परिचय करून दिला.
याप्रसंगी सुप्रसिद्ध व्याख्याते रामेश्वर भदाणे यांनी आपल्या ओजस्वी व विचारप्रवर्तक भाषणातून राष्ट्रपिता महात्मा फुले आणि विश्वरत्न डॉ.आंबेडकर यांचे सामाजिक शैक्षणिक कार्य विशद केले. त्यांनी शिक्षण, समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि मानवतेच्या मूल्यांची आजच्या समाजात अधिक गरज असल्याचे
अधोरेखित केले. तसेच अंधश्रद्धा, अन्याय आणि सामाजिक विषमता याविरोधात लढण्यासाठी महापुरुषांच्या विचारांचा स्वीकार करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भदाणे पुढे म्हणाले, शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचे विचारच समाजाला दिशा देणारे आहेत. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजपरिवर्तन घडविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. समानता व समता, न्याय व सामाजिक न्याय याविषयी महापुरुषांच्या जीवनातील विविध उदाहरण दाखले देऊन दोन्ही मूल्य उपस्थितांना विस्तृतपणे सोप्या पद्धतीने सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही टी माळी यांनी अंधश्रद्धा व कर्मकांडापासून दूर राहून सत्यशोधक विचार आत्मसात करावा असे सांगितले. सुत्रसंचलन माजी सचिव गोपाल माळी तर आभार विश्वस्त कैलास माळी यांनी मानले. याप्रसंगी शहरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता, क्रीडा, साहित्य क्षेत्रातील मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी दोन्ही पंचमंडळाने सहकार्य केले.

