जगातील सर्वात मोठे विहार व तिथं साजरी होणारी बुद्ध जयंती .
![]()
जगातील सर्वात मोठे विहार व तिथं साजरी होणारी बुद्ध जयंती .
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
भारतातील कलिंग राज्याचे बौद्ध धर्मीय शैलेंद्र राज वंशीय घराणे ( महायानी ) ई. स. ७५० च्या दरम्यान इंडोनेशियात गेले . तिथं त्यांनी आपले साम्राज्य प्रस्थापित करून ते दक्षिण पूर्व आशिया पर्यंत विस्तारित केले . या राजवांशातील राजा इंद्र यांनी ई.स. ७८२ ते ८१२ च्या दरम्यान बोरोबुदूर ( बोरो म्हणजे मोठा व बुदूर म्हणजे बुद्ध ) नावाचे बुद्ध विहार ( आपल्या भाषेत सांगायचे म्हणजे ‘ महा बोधी महविहार ) मध्य जावा तील केडू खोऱ्यात( मेगलेंग येथील योग्याकार्ता शहरी ) निर्माण केले . हे विहार २५२० चौरस मीटर मध्ये वसलेले आहे . याचा पाया ११८ बाय ११८ मीटर चा आहे . याची उंची ३५ मीटर एवढी आहे . हे विहार एकूण ९ थरांचे आहे यातील ६ थर चौकोनी तर ३ थर गोलाकार आहेत . या करिता चुन्याचा वापर न करता विशाल दगडी पायऱ्यांचा वापर करण्यात आला आहे . या विहारात एकूण २६७२ शिल्प असून ५०४ बुद्ध मूर्ती आहेत . मुख्य घुमटाच्या आजू बाजूस ७२ बुद्ध मूर्ती आहेत . या विहाराच्या भिंतीवर व कठड्यावर १४६० जातक कथा अर्थात कथाशिल्प आहेत . आतापर्यंतच्या शिल्पांच्या बाबतीत सर्वाधिक शिल्प ( ४१३२) आपल्याला इथेच मिळतात . जगातील सर्वाधिक ‘ शील्पांचे संग्रहालय ‘ म्हणूनही या विहराची ख्याती आहे . हे बुद्ध विहार विज्ञानातील काम धातू , रूप धातू , अरुप धातू दर्शविणारे विहार आहे असेही नमूद केले गेले आहे . या विहाराचे उद्घाटन राजा समर तुंगाची कन्या प्रमोद बर्धिनी या राजकुमारीने ई.स. ८२४ मध्ये केले आहे असा उल्येख एका शिलालेखात आलेला आहे .
साधारणतः ८ व्या शतकात निर्माण झालेले हे विहार ९ व्या शतकात शैलेंद्र राजवंशाचा पराभव झाल्या पासून काहीसे दुर्लक्षित होत गेले .तसेच ज्वालामुखीच्या उद्रेका मुळे हे विहार राख , माती आणि जंगल मुळे झाकले गेले . साधारणतः १२ व्या शतकापासून हे विशालकाय बुद्ध विहार लोकांच्या नजरेपासून दूर गेले , अनेक लुटारू लोक येथील काही मूर्ती काढून विकत असत, काही संग्राहक संस्था , देश त्यांच्या संग्रहालयात इथल्या मुर्त्या , शिल्प घेऊन जात. कोणीही सामान्य व्यक्ती तिथं जात नसे .
१८११ च्या दरम्यान इथं ब्रिटिश आले असता १८१४ मध्ये थॉमस स्टॅम फोर्ड हा इंग्रज अधिकारी त्याच्या जवळ असलेल्या माहितीच्या आधारे लोकांना विचारत विचारत या जागेजवळ पोहचला .अर्थात या करिता त्याला खूप कष्ट उपसावे लागले . तिथले दृश्य पाहून तो अतिशय भारावला व त्या संबंधीचा अहवाल त्याने ब्रिटिश सरकारला सादर केला . त्याच्या प्रयत्नामुळे हे विहार नव्याने जनतेसमोर आले . १९ व्या शतकात थिओडर व्हैन अर्प या दुसऱ्या इंग्रज अधिकाऱ्याने एक सर्वे केला तेंव्हा त्याला असे आढळून आले की , बोरोबुदर या विहारा लगत अजून दोन विहारं आहेत व त्यांची नावे पावन बुद्ध विहार , मेंडुर बुद्ध विहार असे आहे . बोरोबुदर , पावन व मेंडुर ही तिघं विहारं एका सरळ रेषेत आहेत असे त्याने दाखऊन दिले व या तिघं विहारांचा एकाच सरळ रेषेतील नकाशा त्याने प्रसिद्ध केला . त्याच्या या नकाशामुळे या स्थळांना जागतिक पातळीवर अधिकच प्रसिध्दी मिळाली .
थॉमस व थिओडर यांच्या प्रयत्नांनी हे स्थळ चर्चेत आल्याने इथं पर्यटकांची संख्या वाढू लागली . बोरोबुदूर हे पर्यटन स्थळ आज इंडोनेशियातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते . २० व्या शतका पासून पर्यटन क्षेत्रातील सर्वाधिक आर्थिक उत्पन्न या देशाला याच विहारा पासून मिळत आले आहे . दरवर्षी किमान १० लाख पर्यटक इथं भेट देतात . १९७५ ते १९८२ पर्यंत या विहाराचा जीर्णोद्धार करण्यात आला . १९८३ मध्ये युनेस्को ने या विहारास ‘ जागतिक वारसा स्थळ ‘ म्हणून घोषित केले .
७ व्या ते १५ व्या शतका पर्यंत बौद्ध देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडोनेशियात २०१८ मध्ये बौद्ध लोकसंख्या ०.७७ टक्के इतकी अल्प राहिली आहे . इंडोनेशियाची २०१८ ला एकूण २६ कोटी ६५ लाख ३४ हजार ८३६ लोकसंख्या होती त्यात बौद्ध जनता २० लाख ६२ हजार १५० इतकी होती . इंडोनेशियाच्या ३६ राज्यांपैकी १० राज्यांमध्ये बौद्ध लोक बऱ्यापैकी आहेत . रियाऊ बेटे या राज्यात ७.३३ टक्के लोक बौद्ध आहेत. या देशातील बौद्ध जनतेवर कनफ्यूशियस व ताओ विचारसरणीचा प्रभाव आहे . इथल्या काही जाती , जमाती सुद्धा बौद्ध परंपरेचे पालन करतात . १९ व्या शतका पासून इथं बौद्ध लोक कमी असले तरी या स्थळाकडं लोक श्रद्धेने व आस्थेने बघतात.
बुद्ध जयंती अर्थात वैशाख पौर्णिमा हा सण इथं मोठ्या उत्साहात साजरा होत असतो . हा सण शासकीय पातळीवर सुद्धा साजरा होत असतो . या दिवशी देशभरात सार्वजनिक सुट्टी असते .लोक वेगवेगळ्या विहारात जाऊन हा सण आनंदाने साजरा करतात. सर्वात मोठा उत्सव बोरोबुदूर या विशालकाय बुद्ध विहारात साजरा केला जातो . कार्यक्रमाची सुरवात मेंडुर नामक बुद्ध विहारा पासून होते . इथून भव्य शोभायात्रा सुरू केली जाते , पावन बुद्ध विहाराला प्रदक्षिणा घातल्या नंतर ही शोभा यात्रा बोरोबुदूर इथं येते . इथं विविध प्रकारचे धार्मिक विधी पार पाडले जातात . विहारास परिक्रमा केली जाते . रात्रीच्या वेळेस हजारो आकाश कंदील आकाशात सोडले जातात .या ठिकाणी विविध देशांमधून हजारोच्या संख्येने बौद्ध भिक्खू येतात . या देशातील बहुतांश भिक्खू इथं आलेले असतात . लाखोच्या संख्येने नागरिक इथं येतात , विहारा लागत विविध प्रकारची दुकाने लागलेली असतात , सर्वत्र सजावट केलेली असते , अतिशय आनंदमय वातावरणात लोक बुद्ध जयंतीचा आनंद लुटतात .
लेखक ……..
. जयसिंग वाघ
अजिंठा हाउसिंग सोसायटी , अजिंठा चौक , जळगाव
संपर्क …….. ९८८१९२८८८१

