अमळनेरात डिजिटल जनगणना प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप; अचूकतेच्या दिशेने ठोस पाऊल
![]()
अमळनेरात डिजिटल जनगणना प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप; अचूकतेच्या दिशेने ठोस पाऊल
अमळनेर प्रतिनिधी :
भारताच्या प्रगतीचा पाया म्हणजे अचूक माहिती, आणि त्या माहितीचा सर्वात मोठा स्त्रोत म्हणजे जनगणना. २०२७ मध्ये होणारी डिजिटल जनगणना ही केवळ एक प्रक्रिया नसून आधुनिक भारताच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर अमळनेर येथे प्रगणक व संबंधित अधिकाऱ्यांसाठी आयोजित तीन दिवसीय सखोल प्रशिक्षण शिबिराचा समारोप २९ एप्रिल रोजी उत्साहात पार पडला.
न्यू ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल येथे २७ एप्रिलपासून सुरू झालेल्या या प्रशिक्षणाला सुरुवातीपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जनगणना चार्ज अधिकारी तथा तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, सहाय्यक महसूल जनगणना अधिकारी संगीता घोंगडे आणि टेक्निकल असिस्टंट विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले.
डिजिटल माध्यमातून होणारी ही जनगणना पारंपरिक पद्धतींपेक्षा अधिक वेगवान, पारदर्शक आणि अचूक ठरणार आहे. मोबाईल अॅप्स, टॅबलेट्स व ऑनलाईन प्रणालींच्या माध्यमातून माहिती संकलन होणार असल्याने वेळेची बचत होईल तसेच मानवी चुका कमी होतील. शासनाला यामुळे अधिक विश्वासार्ह व अद्ययावत माहिती मिळून विविध विकास योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
प्रशिक्षणातील प्रमुख मुद्दे
या प्रशिक्षणामध्ये जनगणना २०२७ संदर्भातील विविध महत्त्वपूर्ण बाबींवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यात जनगणनेची संकल्पना व व्याख्या, इमारत व घर यादी तयार करणे, गट मांडणी, दर्शक नकाशा तयार करणे, मोबाईल अॅप्सचा वापर, डेटा गोपनीयता व सुरक्षितता, महिला सुरक्षितता, डेटा प्रामाणिकरण, प्रोटोकॉल, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या, कुटुंबाशी संपर्क साधण्याच्या पद्धती आणि प्रश्न विचारण्याच्या तंत्रांचा समावेश होता.
ट्रेनर प्रशिक्षक अनिल महाजन (मुख्याध्यापक, महात्मा फुले हायस्कूल, देवगाव), मुकेश अहिरे (मुख्याध्यापक, के.पी. सोनार विद्यालय), तसेच दिलीप पाटील, लक्ष्मणराव पाटील, लक्ष्मीकांत सैदाणे, प्रमोद कदम, आनंद मंगले, प्रदीप सोनवणे यांनी ‘घर यादी’ व ‘घरगणना’ या विषयांवर प्रत्यक्ष उदाहरणांसह सविस्तर मार्गदर्शन केले.
ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व
१८८१ साली सुरू झालेली भारतीय जनगणनेची परंपरा आता १६व्या टप्प्याकडे वाटचाल करत असून, यावेळी प्रथमच डिजिटल पद्धतीने जनगणना होणार आहे, ही विशेष बाब आहे. ‘स्व-जनगणना’ हे प्रत्येक नागरिकाचे घटनात्मक कर्तव्य असल्याची जाणीव यावेळी करून देण्यात आली. घरांची स्थिती, पाणीपुरवठा, शौचालय, मालमत्ता यांसह ३४ प्रश्नांची अचूक नोंदणी कशी करावी यावर विशेष भर देण्यात आला.
उत्स्फूर्त सहभाग
पहिल्या दिवशी बॅच क्रमांक ५,६’७’८ रूम क्रमांक १,२’३’४ मध्ये प्रशिक्षण पार पडले. प्रगणक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान चहा व जेवणाचीही उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती.
समारोप सोहळा
समारोपप्रसंगी प्रशिक्षक मुख्याध्यापक ट्रेनर अनिल महाजन व मुकेश अहिरे यांचा सत्कार कमलाकर संदानशिव, एच.ओ. माळी, दिग्विजय देसले, सी.आर. पाटील, के.ई. सोनवणे, जैन सर, विजय पाटील, गुरव सर, दीपक पाटील, महेश पाटील,किशोर सोनवणे, योगेश चौधरी आदी शिक्षक बंधूंनी बुके व पेन देऊन केला.
तसेचट्रेनर मुकेश अहिरे यांचा सत्कार मंगला चव्हाण, मोहिनी पाटील, पल्लवी पाटील ,छाया जाधव मॅडम मंगला गायकवाड मॅडम मंगला पाटील मॅडम जयश्री पाटील व इतर शिक्षिका भगिनींनी केला.
प्रगणक म्हणून पल्लवी पाटील मॅडम यांनी मनोगत व्यक्त करत प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष कामात होईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवगाव-देवळी हायस्कूलचे शिक्षक ईश्वर महाजन यांनी केले, तर समारोप नियोजन व प्रस्ताविक दिनेश पाटील यांनी सविस्तर केले.
या प्रशिक्षणामुळे आगामी जनगणना अधिक अचूक, पारदर्शक आणि प्रभावीपणे पार पाडण्यास निश्चितच मदत होणार असून अमळनेरचा हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरत आहे.





