“मिल के चलो”चा विज्ञानदूत उपक्रम : प्रयोगातून उलगडले ज्ञानाचे विश्व अमळनेर तालुक्यातील ५० विद्यार्थ्यांचा दोन दिवसीय निवासी शिबिरात उत्स्फूर्त सहभाग
![]()
“मिल के चलो”चा विज्ञानदूत उपक्रम : प्रयोगातून उलगडले ज्ञानाचे विश्व
अमळनेर तालुक्यातील ५० विद्यार्थ्यांचा दोन दिवसीय निवासी शिबिरात उत्स्फूर्त सहभाग
अमळनेर प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करून त्यांना पाठांतराच्या पलीकडे नेण्याचा ध्यास घेतलेल्या “मिल के चलो” असोसिएशनने पुन्हा एकदा आपल्या उपक्रमातून विज्ञानाचा प्रकाश झळकावला आहे. गेल्या सात वर्षांपासून तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सातत्याने कार्यरत असलेली ही संस्था विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग, कृती आणि मॉडेलच्या माध्यमातून विज्ञान समजावून सांगत आहे.
इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञानातील गुंतागुंतीच्या संकल्पना सोप्या करून दाखवणारे विविध प्रयोग राबवले जात आहेत. त्याचबरोबर वावडे व शिरूड येथे ‘विज्ञान घर’ या अनौपचारिक केंद्रांद्वारे हायस्कूल विद्यार्थ्यांनाही विज्ञानाचा अभ्यास अनुभवाधारित पद्धतीने करण्याची संधी दिली जात आहे.
या सर्व उपक्रमांचा प्रभाव जाणून घेण्यासाठी दि. २७ व २८ एप्रिल २०२६ रोजी अमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात दोन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले. नंदगाव, कावपिंप्री, जळोद, देवळी, पिंगळवाडे येथील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी तसेच ‘विज्ञान घर’मधील विद्यार्थी अशा एकूण ५० जिज्ञासू विद्यार्थ्यांचा सहभाग या शिबिरात पाहायला मिळाला.
शिबिरामध्ये विज्ञान केवळ पुस्तकापुरते मर्यादित न राहता ते खेळ, प्रयोग आणि अनुभव यामधून कसे जिवंत होते, याचा प्रत्यय विद्यार्थ्यांना आला. बौद्धिक व्हिडिओ, विज्ञान खेळणी, विविध सायन्स अॅक्टिव्हिटी, वैचारिक प्रेरणा, मैदानी खेळ तसेच गप्पा-गाणी यामुळे शिबिरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित शाळांच्या शिक्षकांनीही भेट देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.
शिबिरातील आकर्षण ठरले ते प्रत्यक्ष प्रयोग—
प्लास्टिक पिशवी व दोऱ्याच्या साहाय्याने पॅराशूट तयार करणे, मायक्रोस्कोपखाली स्लाईड्सचे निरीक्षण, स्वतः वनस्पती पेशीची स्लाईड तयार करणे तसेच पाण्यात साखर मिसळून वेगवेगळ्या घनतेचे थर तयार करण्याचा प्रयोग… या सर्व उपक्रमांमधून ‘घनता’सारखी संकल्पना विद्यार्थ्यांना सहज आणि प्रभावीपणे समजली.
उत्क्रांती सिद्धांतावर चार्ल्स डार्विन यांच्या प्रयोगांची माहिती विनायक पाटील यांनी ॲक्टिव्हिटीद्वारे दिली, तर ज्ञानेश्वर मोरे (जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स) यांनी विद्यार्थ्यांशी कला आणि चित्रकलेविषयी संवाद साधत प्रत्यक्ष पोर्ट्रेट सादर केले. विजय पवार यांनी उपग्रह, रॉकेट प्रक्षेपण, नासा, इस्रो आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाविषयी व्हिडिओद्वारे माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला नवे पंख दिले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनिरुद्ध पाटील यांनी चांगल्या सवयींचे महत्त्व पटवून देत प्रत्येकाने एक वाईट सवय कमी करण्याचा संकल्प करण्यास प्रवृत्त केले.
विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था प्रताप महाविद्यालयाच्या वसतिगृहात स्वतंत्रपणे करण्यात आली होती. या यशस्वी शिबिराचे नियोजन अनिरुद्ध पाटील, सौ. कल्याणी पाटील, विनायक पाटील, चेतन वैराळे, सुनिल पावरा, अशोक पाटील, अतुल सैंदाणे व विवेक सूर्यवंशी यांनी केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची खरी ओळख करून देत, त्यांच्या जिज्ञासेला दिशा देणारा हा उपक्रम म्हणजे ‘मिल के चलो’चा खरा विज्ञानदूत प्रयत्न ठरत आहे.



