प्रामाणिकपणे काम करा!” — तहसीलदार सुराणा यांचे प्रगणकांना मार्गदर्शन , न्यू ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये जनगणना प्रशिक्षण; शिक्षकांची मोठी उपस्थिती
![]()
“प्रामाणिकपणे काम करा!” — तहसीलदार सुराणा यांचे प्रगणकांना मार्गदर्शन
न्यू ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये जनगणना प्रशिक्षण; शिक्षकांची मोठी उपस्थिती
अमळनेर प्रतिनिधी :
भारतीय जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथे प्रगणक व संबंधित अधिकाऱ्यांसाठी तीन दिवसीय सखोल प्रशिक्षणाला उत्साहात सुरुवात झाली. न्यू ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल येथे 27 एप्रिलपासून सुरू झालेल्या या प्रशिक्षण शिबिराचा पहिला दिवस यशस्वीरीत्या पार पडला. सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत चालणाऱ्या या प्रशिक्षणामध्ये जनगणनेच्या प्रत्येक टप्प्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी जनगणना अधिकारी तथा तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी विविध ब्लॉक्सना प्रत्यक्ष भेट देत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. “कोणताही प्रश्न मनात न ठेवता प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने जनगणनेचे कार्य पार पाडावे,” असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रगणकांना कार्याची स्पष्ट दिशा मिळाली.
या प्रशिक्षणासाठी महात्मा फुले हायस्कूल, देवगावचे मुख्याध्यापक अनिल महाजन, के.पी. सोनार माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश अहिरे, तसेच दिलीप पाटील, लक्ष्मणराव पाटील, लक्ष्मीकांत सैदाणे, प्रमोद कदम, आनंद मंगले आणि प्रदीप सोनवणे हे अनुभवी प्रशिक्षक मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी पहिल्या टप्प्यात ‘घर यादी’ व ‘घरगणना’ या विषयांवर प्रत्यक्ष उदाहरणांसह सविस्तर माहिती दिली.
भारतीय जनगणना ही देशाच्या विकासाचा पाया मानली जाते. 1881 साली सुरू झालेली ही परंपरा आता 16व्या जनगणनेकडे वाटचाल करत असून, यावेळी प्रथमच डिजिटल पद्धतीने जनगणना होणार आहे, ही विशेष बाब आहे. ‘स्व-जनगणना’ ही प्रत्येक नागरिकाचे घटनात्मक कर्तव्य असल्याची जाणीवही यावेळी करून देण्यात आली.
प्रशिक्षणामध्ये घरांची स्थिती, उपलब्ध सुविधा, पिण्याच्या पाण्याचे स्रोत, शौचालय व्यवस्था, मालमत्ता यांसह विविध बाबींची माहिती कशी नोंदवायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच लोकसंख्या गणनेदरम्यान विचारण्यात येणाऱ्या 34 प्रश्नांची माहिती आणि त्यांची अचूक नोंदणी कशी करावी, यावर विशेष भर देण्यात आला.
पहिल्या दिवशी बॅच क्रमांक 5, रूम क्रमांक 1 मध्ये अनिल महाजन व मुकेश अहिरे यांनी सखोल मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणास प्रगणक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रशिक्षणामुळे आगामी जनगणना अधिक अचूक, पारदर्शक आणि प्रभावीपणे पार पाडण्यास निश्चितच मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

