यशोगाथा* , *बचतगटातून स्वावलंबनाकडे वाटचाल..* *उद्योजिका रुपाली कोळी यांची प्रेरणादायी यशोगाथा*
1 min read

यशोगाथा* , *बचतगटातून स्वावलंबनाकडे वाटचाल..* *उद्योजिका रुपाली कोळी यांची प्रेरणादायी यशोगाथा*

Loading

*यशोगाथा*

*बचतगटातून स्वावलंबनाकडे वाटचाल..*
*उद्योजिका रुपाली कोळी यांची प्रेरणादायी यशोगाथा*

जळगांव प्रतिनिधी
शहरी महिलांनी अनेक क्षेत्रांत आपले कौशल्य सिद्ध करत पुरुषप्रधान क्षेत्रांमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र ग्रामीण भागात आजही अनेक महिलांचे आयुष्य ‘चूल आणि मूल’ याच मर्यादेत अडकलेले दिसते. अशा परिस्थितीत महिलांना सक्षम बनविण्यासाठी स्वयंसहाय्यता बचतगटांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. बचतगट महिलांना आर्थिक आधार देण्याबरोबरच त्यांच्यात आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमता विकसित करतात.
जळगाव जिल्ह्यातील जळगाव खुर्द येथील सौ. रुपाली लक्ष्मण कोळी या अशाच जिद्दी आणि कर्तृत्ववान महिला उद्योजिका आहेत. त्यांनी स्वतःच्या मेहनतीने केवळ स्वतःचे आयुष्य बदलले नाही, तर गावातील इतर महिलांनाही स्वावलंबनाचा मार्ग दाखवला आहे.

*कालिका मातेच्या साक्षीने घेतलेला निर्धार*
सन 2015 च्या सुमारास गावात बचतगटांची संकल्पना फारशी प्रचलित नव्हती. त्यामुळे महिलांना खासगी सावकारांकडून जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागत होते. या परिस्थितीने त्रस्त झालेल्या रुपालीताईंनी गावातील महिलांना एकत्र आणले. कालिका मातेच्या मंदिरासमोर सर्वांनी एकत्र येऊन “जय महाकालिंका माता बचतगट” स्थापन करण्याचा निर्धार केला. याच क्षणापासून त्यांच्या परिवर्तनाच्या प्रवासाला सुरुवात झाली.

आज त्यांच्या नेतृत्वाखाली केवळ एक गटच नव्हे, तर तब्बल 27 बचतगट कार्यरत असून, त्या सीआरपी (Community Resource Person) म्हणून इतर गटांनाही मार्गदर्शन करीत आहेत.

*शिस्त, बचत आणि आर्थिक सक्षमीकरण*
गटातील महिलांनी दरमहा 100 रुपयांची नियमित बचत सुरू केली. या सातत्यपूर्ण बचतीमुळे बँकेचा विश्वास संपादन झाला आणि गटाला 50 हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले. या निधीतून महिलांनी विविध लघुउद्योग सुरू केले. रुपालीताईंनी साडी विक्रीचा व्यवसाय सुरू केला, तर इतर महिलांनी शेळीपालन, कुक्कुटपालन यांसारखे व्यवसाय उभे केले.
तथापि, साडी व्यवसायात उधारीमुळे आलेल्या अडचणींमुळे त्यांना हा व्यवसाय बंद करावा लागला. पण या अपयशाने त्यांचा आत्मविश्वास ढळला नाही.

*अपयशातून शिकत यशाची नवी दिशा*

अपयशाला संधी मानत त्यांनी नवीन क्षेत्र निवडले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सहकार्याने त्यांनी वर्धा येथे मसाला उत्पादनाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर “समर्थ स्वादिष्ट मसाला” या नावाने त्यांनी स्वतःचा उद्योग सुरू केला.
गुणवत्तेला प्राधान्य देत त्यांनी विविध प्रकारचे मसाले तयार करण्यास सुरुवात केली. योग्य पॅकिंग, सातत्यपूर्ण गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास यामुळे त्यांच्या उत्पादनांना अल्पावधीतच मोठी मागणी मिळाली. गावातील तसेच परिसरातील किराणा दुकानदारांनी त्यांचे मसाले विक्रीसाठी ठेवण्यास सुरुवात केली.

*बाजारपेठेत विस्तार आणि ओळख*
मुंबई येथील महालक्ष्मी सरस प्रदर्शनात सहभाग घेतल्यामुळे त्यांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळाली. नवीन ग्राहक, व्यापारी संपर्क आणि अनुभव यामुळे त्यांच्या व्यवसायाला अधिक बळ मिळाले. आज त्यांच्या मसाल्यांची विक्री विविध ठिकाणी होत असून, दिवसाला सुमारे 10 किलोपर्यंत उत्पादन विकले जाते.

कुटुंबाचा पाठिंबा – यशाची गुरुकिल्ली

रुपालीताईंना त्यांच्या पतींचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. शेतीतील उत्पन्न कमी झाल्यानंतर त्यांनीही व्यवसायात हातभार लावला. कुटुंबाच्या सहकार्यामुळेच रुपालीताईंना उद्योगात स्थिरता आणि प्रगती साधता आली.

*‘एक हजार दिवसांचा संघर्ष’ – यशाचा मंत्र*

रुपालीताई सांगतात की, कोणताही व्यवसाय यशस्वी होण्यासाठी किमान एक हजार दिवसांचा संघर्ष आवश्यक असतो. या काळात आलेल्या अडचणींवर मात करत धैर्याने पुढे गेल्यासच खरे यश मिळते. हा त्यांचा अनुभव इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

*पुरस्कार आणि सामाजिक योगदान*

त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना “हिरकणी महिला उद्योजिका पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे. याशिवाय त्या इतर महिलांना मार्गदर्शन करून त्यांना स्वावलंबनाकडे प्रेरित करत आहेत. सौ. रुपाली कोळी यांची यशोगाथा ही ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. बचतगटाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचा विकास साधत इतर महिलांनाही आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे. त्यांच्या जिद्दीने आणि आत्मविश्वासाने हे सिद्ध केले आहे की, योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण महिलाही कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतात. त्यांची ही प्रेरणादायी वाटचाल अनेक महिलांसाठी आशेचा किरण ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *