फुले विचारांची ज्योत अमळनेरात तेजाळली!” — द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त भव्य कार्यशाळेतून समतेचा जागर साने गुरुजी हॉलमध्ये विचारांचा महापूर; प्रा. डॉ. लीलाधर पाटील यांचे प्रभावी मार्गदर्शन, 200 व्याख्यानांच्या उपक्रमातून समाजपरिवर्तनाचा संकल्प-प्रा अशोक पवार
![]()
“फुले विचारांची ज्योत अमळनेरात तेजाळली!” — द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त भव्य कार्यशाळेतून समतेचा जागर
साने गुरुजी हॉलमध्ये विचारांचा महापूर; प्रा. डॉ. लीलाधर पाटील यांचे प्रभावी मार्गदर्शन,
200 व्याख्यानांच्या उपक्रमातून समाजपरिवर्तनाचा संकल्प-प्रा अशोक पवार
अमळनेर प्रतिनिधी
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त “महात्मा फुले यांचे तत्त्वज्ञान” या विषयावर आयोजित करण्यात आलेली भव्य कार्यशाळा गुरुवार, दि. 23 एप्रिल 2026 रोजी साने गुरुजी हॉल, प्रताप कॉलेज, अमळनेर येथे उत्साहात संपन्न झाली. ही कार्यशाळा केवळ एक कार्यक्रम न ठरता, विचारांची चळवळ उभी करण्याचा निर्धार ठरली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या सत्काराने झाली. यावेळी महिला भगिनींनी “आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले खुले” हे गीत सादर करत वातावरण भारावून टाकले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयाराम पाटील यांनी केले, तर प्रस्ताविकात युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी सांगितले की, समता कल्याण प्रतिष्ठान, संविधान जागर आणि मराठा सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबवले जात असून, आतापर्यंत 200 हून अधिक व्याख्यानांच्या माध्यमातून फुले विचार समाजात पोहोचवले गेले आहेत.
विचारांचा गाभा — प्रा. डॉ. लीलाधर पाटील यांचे प्रभावी मार्गदर्शन
मुख्य वक्ते प्रा. डॉ. लीलाधर पाटील यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि परखड भाषणातून महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा सखोल वेध घेतला. ते म्हणाले की,
महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते एक क्रांतिकारक तत्त्वज्ञानी होते. त्यांच्या विचारांची उपयुक्तता आजही तितकीच प्रभावी आहे.
फुले यांच्या काळातील सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थिती स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, इंग्रजांनी आणलेल्या धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला, तर पेशवाई काळात कर्मकांडाचा अतिरेक होता. अशा परिस्थितीत फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजजागृतीचा दीप प्रज्वलित केला.
“विद्या तीच खरी, जी माणसाला मती आणि गती देते,” या फुले यांच्या विचाराचा संदर्भ देत त्यांनी आजच्या शिक्षण पद्धतीवरही भाष्य केले. आजची शिक्षणव्यवस्था केवळ पोपटपंची शिकवते, परंतु विद्यार्थ्यांना तार्किक बनवत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
सामाजिक प्रश्नांवर परखड प्रहार
प्रा. पाटील यांनी अंधश्रद्धा, सामाजिक विषमता आणि शोषण यांवर तीव्र प्रहार करत फुले यांच्या ‘गुलामगिरी’ ग्रंथातील विचारांची उजळणी केली. त्यांनी सांगितले की, समाजपरिवर्तनासाठी संवादात्मक शिक्षण पद्धती अत्यावश्यक आहे आणि त्याचा अवलंब फुले यांनी त्यांच्या काळातच केला होता.
महात्मा फुले यांनी सर्वसामान्य, शोषित आणि वंचित घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. 1853 साली त्यांच्या शाळेच्या कार्याची इंग्लंडपर्यंत दखल घेतली गेली, ही बाब त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केली.
फुले विचारांची नेमकी दिशा अधोरेखित करत ठाम भूमिका मांडली. ते म्हणाले, महात्मा फुले यांचे समग्र वाड्मय प्रत्येक तालुक्यात सहज उपलब्ध झाले पाहिजे—कारण विचार लोकांपर्यंत पोहोचले तरच परिवर्तन घडते. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, फुले तत्त्वज्ञानाचा गाभा म्हणजे आंधळ्या श्रद्धेला नकार आणि तर्काला मान्यता. “प्रयत्न करा, विचार करा आणि विवेकाने जगा,” हा त्यांचा संदेश आजही तितकाच जिवंत आहे. विषमता ही समाजाची जखम आहे; तिला ठाम नकार देत समतेला होकार देणे, हेच फुले विचारांचे खरे सार आहे, असे सांगत त्यांनी उपस्थितांच्या मनात विचारांची ठिणगी पेटवली.
अध्यक्षीय भाषणात प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य हर्षवर्धन जाधव यांनी थेट आणि ठसक्यात संदेश दिला. ते म्हणाले, महात्मा फुले समजून घ्यायचे असतील तर केवळ नाव जपून उपयोग नाही, तर त्यांच्या विचारांचा स्वीकार करावा लागेल. फुले यांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील भिंत ओळखून अंधश्रद्धेला ठामपणे नाकारले आणि माणसाने कर्मावर विश्वास ठेवावा, असे स्पष्ट सांगितले. आजच्या काळातही समाज अनेक गैरसमजांच्या जाळ्यात अडकलेला दिसतो, अशावेळी फुले विचार हीच खरी दिशा आहे. “अंधश्रद्धा सोडा, विवेक स्वीकारा आणि कृतीतून परिवर्तन घडवा,” असा ठाम संदेश देत त्यांनी उपस्थितांना विचारप्रवृत्त केले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रताप विद्यालयाचे प्राचार्य हर्षवर्धन जाधव होते. विचारपीठावर धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील,युवा कल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष
प्रा. अशोक पवार,सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी अशोक बि-हाडे
यांची प्रमुख उपस्थिती होती.
जळगाव जिल्ह्यातील अनेक अभ्यासक, विद्यार्थी आणि वाचकांनी मोठ्या संख्येने बंधू व भगिनी सह यांनी सहभाग नोंदवला.कार्यक्रमाच्या शेवटी प्रा राहूल निकम यांनी आभार प्रदर्शन केले.
ही कार्यशाळा फुले विचारांची केवळ उजळणी न करता, समाजपरिवर्तनासाठी नव्या पिढीला प्रेरणा देणारी ठरली.


