टिईटीत सलग यशाचा विक्रम! , ज्ञानेश्वर पाटील सरांचे सहावे दैदिप्यमान यश
![]()
टिईटीत सलग यशाचा विक्रम!
ज्ञानेश्वर पाटील सरांचे सहावे दैदिप्यमान यश
अमळनेर प्रतिनिधी :
गजानन माध्यमिक विद्यालय, राजवड (आदर्शगांव) ता. पारोळा जि. जळगाव येथील कर्तव्यदक्ष व अभ्यासू शिक्षक ज्ञानेश्वर प्रकाश पाटील सर यांनी शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी) तब्बल सहाव्यांदा उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
देशातील पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांवर कार्यरत शिक्षकांना मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या निर्णयानुसार दि. ३० ऑगस्ट २०२७ पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. या निर्णयामुळे अनेक शिक्षकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले असताना ज्ञानेश्वर पाटील सर यांनी सातत्यपूर्ण परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर पुन्हा एकदा टिईटी उत्तीर्ण होऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
पाटील सर यांनी २०१३, २०१४, २०१५, २०१७, २०१८ आणि २०२५ या वर्षांत परीक्षा देत प्रत्येक वेळी यश संपादन केले. महाराष्ट्रात ही परीक्षा आतापर्यंत केवळ आठ वेळा घेण्यात आली असून त्यापैकी सहा वेळा परीक्षा देऊन प्रत्येक वेळी यश मिळवणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
दरम्यान, त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सेवानिवृत्त केंद्रप्रमुख आबासाहेब गोकुळ पाटील तसेच पत्रकार ईश्वर महाजन यांनी ज्ञानेश्वर पाटील यांच्या घरी जाऊन भेट घेत त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सहदय सत्कार केला. यावेळी त्यांनी ज्ञानेश्वर पाटील सरांना भावी वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या जिद्द, चिकाटी व शैक्षणिक कार्याचे कौतुक केले.

