*के.सी.ई. सोसायटी संचालित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे ए.आय रोबोटिक्स व कॉम्प्युटेशनल थिंकिंग या नवीन अभ्यासक्रमाला सुरुवात*
![]()
*के.सी.ई. सोसायटी संचालित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे ए.आय रोबोटिक्स व कॉम्प्युटेशनल थिंकिंग या नवीन अभ्यासक्रमाला सुरुवात*
जळगाव दि. २१/०४/२०२६: के.सी.ई. सोसायटी जळगाव संचालित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे आयोजित पालक-शिक्षक समितीच्या बैठकीत शाळेतील शैक्षणिक प्रगतीचा सखोल आढावा घेण्यात आला. या बैठकीत आधुनिक शिक्षणाला चालना देणारा आणि भविष्यातील कौशल्य विकासावर भर देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत एआय, रोबोटिक्स व कॉम्प्युटेशनल थिंकिंग या नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात करण्याचा ऐतिहासिक व सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला. शाळेने सन २०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून हे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाचे पालक व मान्यवरांनी उत्स्फूर्त स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी व तांत्रिक क्षमतांच्या वृद्धीसाठी हे पाऊल अत्यंत दूरदर्शी मानले जात आहे.
या कार्यक्रमास के.सी.ई. सोसायटी, जळगावचे संचालक डॉ. ए. आर. राणे तसेच इंटल ब्लूमचे संचालक श्री गौरव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे संचालक श्री. डॉ. ए. आर. राणे यांनी संस्थेच्या वतीने शाळेमध्ये एआय रोबोटिक्स व कॉम्प्युटेशनल थिंकिंग हे अभ्यासक्रम सुरू करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास, विश्लेषणात्मक क्षमता, समस्या निराकरण कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत शिक्षण यासाठी हे विषय अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच श्री गौरव पाटील यांनी या अभ्यासक्रमांचे शालेय शिक्षणात महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचारसरणी, सर्जनशीलता आणि नवोन्मेषी दृष्टिकोन विकसित करण्यासाठी हे उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले.
सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करत श्री अण्णासाहेब बेंडाळे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. शैक्षणिक, कला, क्रीडा व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी पालक-शिक्षक सभेतील सर्व सन्माननीय सदस्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सर्व सदस्यांना शाळेच्या वतीने स्मृतीचिन्ह म्हणून फोटो फ्रेम देऊन गौरविण्यात आले.
तसेच पालक-शिक्षक संघ प्रमुख सौ. प्रतिभा लोहार यांनी मनोगत व्यक्त करत पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्या सहकार्यानेच गुणवत्तापूर्ण शिक्षण शक्य असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती दिपाली खडके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे पर्यवेक्षक श्री नरेंद्र पालवे, ज्येष्ठ शिक्षक श्री महेंद्र नेमाडे, श्री महेंद्र मिरकुटे तसेच श्रीमती नुतन वराडे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचा समारोप सकारात्मक, प्रेरणादायी आणि नवचैतन्यपूर्ण वातावरणात झाला असून, नव्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यास नवी दिशा मिळणार असल्याचे मत सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात आले.

