शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येलाच शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाला समन्वय समितीचे निवेदन. , तक्रार निवारण सभा तातडीने घेण्याची मागणी; अन्यथा संघटना आक्रमक आंदोलनाच्या पवित्र्यात  ,समन्वय समितीच्या बैठकीत सर्वच शिक्षक संघटनांची आक्रमक भूमिका; प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकमुखी निर्णय
1 min read

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येलाच शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाला समन्वय समितीचे निवेदन. , तक्रार निवारण सभा तातडीने घेण्याची मागणी; अन्यथा संघटना आक्रमक आंदोलनाच्या पवित्र्यात ,समन्वय समितीच्या बैठकीत सर्वच शिक्षक संघटनांची आक्रमक भूमिका; प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकमुखी निर्णय

Loading

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येलाच शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाला समन्वय समितीचे निवेदन.

तक्रार निवारण सभा तातडीने घेण्याची मागणी; अन्यथा संघटना आक्रमक आंदोलनाच्या पवित्र्यात

समन्वय समितीच्या बैठकीत सर्वच शिक्षक संघटनांची आक्रमक भूमिका; प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकमुखी निर्णय

जळगाव प्रतिनिधी
शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येलाच जळगाव जिल्ह्यातील हजारो माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रशासकीय, सेवाविषयक, वेतन व आर्थिक प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याने माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रलंबित प्रश्नांच्या तातडीच्या निवारणासाठी तक्रार निवारण सभा आयोजित करावी, या मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. अन्यथा आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समन्वय समितीने दिला आहे.

शिक्षक दिन हा शिक्षकांच्या ज्ञानदानाच्या कार्याचा गौरव करणारा दिवस असताना, शिक्षकांना मात्र आपल्या हक्काच्या सेवा-सुविधा, वेतनविषयक प्रश्न, आर्थिक देयके आणि प्रशासकीय कामांसाठी वारंवार शिक्षण विभागाच्या कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे शिक्षकांचा मौल्यवान वेळ अध्यापनाऐवजी प्रशासकीय कामकाजात खर्च होत असून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजावर होत असल्याची खंत संघटनांनी व्यक्त केली.

“शिक्षक दिनाच्या दिवशी केवळ शिक्षकांचा सत्कार नको, तर त्यांच्या प्रलंबित प्रश्नांचा निपटारा करा,” अशी ठाम भूमिका सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत मांडली. तक्रार निवारण सभा तातडीने घेऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न एकाच ठिकाणी सोडविण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

एप्रिल-मेपासून जमा केलेली मेडिकल बिले कुठे गेली?

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून एप्रिल-मे २०२६ पासून शिक्षण विभागाकडे जमा करण्यात आलेली काही वैद्यकीय बिले अद्याप सापडत नसल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहेत. उपचारासाठी स्वतःच्या खिशातून खर्च केल्यानंतर प्रतिपूर्ती मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांना वारंवार कार्यालयात जावे लागत आहे.

त्यामुळे एप्रिल-मेपासून जमा झालेल्या सर्व वैद्यकीय बिलांची स्वतंत्र यादी प्रसिद्ध करून प्रत्येक बिलाची सद्यस्थिती स्पष्ट करावी तसेच प्रलंबित बिलांना तातडीने मंजुरी देऊन संबंधित कर्मचाऱ्यांना देय रक्कम अदा करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

SIT व शालार्थ चौकशीच्या नावाखाली नियमित कामांकडे दुर्लक्ष?

जिल्ह्यात सध्या SIT व शालार्थ चौकशीचे काम सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी या कामाच्या नावाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियमित प्रशासकीय कामांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना संघटनांमध्ये निर्माण झाली आहे.

चौकशीची कामे महत्त्वाची असली तरी त्यामुळे नियमित प्रशासकीय कामकाज ठप्प होता कामा नये. मान्यता, वेतन, वैद्यकीय बिले, सेवा नोंदी, निवृत्ती देयके, PF/NPS आदी अत्यावश्यक कामांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

अधिकारी वारंवार नाशिकला; मग जळगावचे काम कोण करणार?

जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना बैठका, चौकशी व इतर प्रशासकीय कामांसाठी वारंवार नाशिक विभागीय कार्यालयात जावे लागत असल्याने जळगाव जिल्ह्यातील नियमित कामकाजावर परिणाम होत असल्याचे कारण दिले जात असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले.

मात्र अधिकारी बाहेर असतील तर पर्यायी प्रशासकीय व्यवस्था करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अधिकारी नाशिकला गेले म्हणून जळगाव जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित राहणे योग्य नाही, अशी संतप्त भूमिका संघटनांनी घेतली.

PF, DCPS, NPS कपातीचा हिशोब द्या!

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या PF, DCPS व NPS कपाती, संबंधित खात्यात जमा होणारी रक्कम, प्रलंबित हप्ते आणि खात्यांमधील तफावत याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.

“पगारातून कपात नियमित होते, मग संबंधित खात्यात रक्कम जमा होण्यास विलंब का?” असा सवाल उपस्थित करून NPS कपाती व प्रलंबित हप्त्यांचा अद्ययावत तपशील देऊन सर्व रक्कम संबंधित खात्यांमध्ये तातडीने जमा करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

शालार्थ e-KYC च्या अडचणी तातडीने सोडवा

शालार्थ प्रणालीमध्ये e-KYC पूर्ण करताना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध तांत्रिक व प्रशासकीय अडचणी येत आहेत. वेतन, सेवा नोंदी, कर्मचारी माहिती, मंजुरी आदी बाबींशी संबंधित अडचणींमुळे कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत विशेष शालार्थ तक्रार निवारण सभा आयोजित करून प्रत्येक प्रकरणाचा जागेवर निपटारा करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

एकाच छताखाली सर्व प्रश्न सोडवा!”

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न वेगवेगळ्या टेबलांवर आणि कार्यालयांमध्ये फिरविण्याऐवजी वेतन पथकाचे अधीक्षक, लेखाधिकारी, शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत तक्रार निवारण सभा आयोजित करून सर्व प्रश्न एकाच ठिकाणी सोडवावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

सभेत प्रत्येक प्रकरणाचा आढावा घेऊन संबंधित प्रश्न किती दिवसांत निकाली काढणार, याची स्पष्ट कालमर्यादा निश्चित करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

शिक्षक दिनी आश्वासन नको, कृती हवी!

माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाने शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी एकमुखी मागणी केली.

“शिक्षक दिन हा केवळ पुष्पगुच्छ, सत्कार आणि भाषणांचा दिवस न राहता शिक्षकांच्या हक्काच्या प्रश्नांच्या निवारणाचा दिवस ठरावा,” अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

तक्रार निवारण सभा तातडीने आयोजित करून प्रलंबित प्रश्नांवर ठोस व कालबद्ध निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. यावर तातडीने कार्यवाही न झाल्यास यापुढे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघटना अधिक तीव्र व आक्रमक आंदोलनाची भूमिका घेतील, असा इशारा समन्वय समितीने प्रशासनाला दिला.

निवेदन देताना विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित

या वेळी जिल्ह्याचे मार्गदर्शक प्र. ह. दलाल, ज्येष्ठ शिक्षक नेते पी. एस. सोनवणे, समन्वयक श्री. तुळशीराम सोनवणे, डॉ. मिलिंद बागुल, शुद्धोधन सोनवणे, शिक्षक परिषदेचे अध्यक्ष गिरीश नेमाडे, कलाध्यापक शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष पी. ए. पाटील, प्रादेशिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष गोविंदा पाटील, प्रदीप सोनवणे, कास्ट्राईब कल्याण महासंघाचे डॉ. मिलिंद बागुल, भाजपा शिक्षक आघाडीचे प्रभाकर बोरसे, सुरेश अहिरे, इस्तु संघटनेचे प्रशांत नरवाडे, बहुजन कर्मचारी संसदेचे देवेंद्र तायडे, सचिव सुनील वानखेडे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शिक्षक सेनेच्या महिला अध्यक्ष सुनिता खडके, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे संजय मधुकर पाटील, डीएड महासंघाच्या सुनिता पाटील, आर. के. पाटील, जळगाव, दिनेश पाटील, जामनेर, संतोष कचरे, एस पी ठाकूर, आकाश बाजगीर, किरण पाटील चोपडा, महेंद्र पवार जळगाव, विनोद महेश्री, सावदा, विकास चौधरी, मुक्ताईनगर, किरण पाटील, चोपडा, किरण कुमार मगर, चाळीसगाव, प्रा. शरद पाटील, भुसावळ, अमोल वाणी, एरंडोल, बी. डी. शिरसाट, अनिल मनुरे, धरणगाव, विनोद पाटील, पारोळा, अश्विनी पाटील, जामनेर यांच्यासह जिल्ह्यातील विविध शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सर्व पदाधिकाऱ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत एकमुखी भूमिका व्यक्त करून प्रशासनाने तातडीने तक्रार निवारण सभा आयोजित करावी, अशी मागणी केली.
“शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला शिक्षकांचा गौरव करण्यापूर्वी त्यांच्या अडचणींकडे पाहा. शिक्षकांना विद्यार्थ्यांपासून आणि अध्यापनाच्या कामापासून दूर करून कार्यालयीन फेऱ्यांमध्ये अडकवू नका. शिक्षकांना सन्मान हवा आहे; मात्र त्याहून आधी त्यांच्या हक्काच्या प्रश्नांचा निपटारा हवा!” असा स्पष्ट इशारा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीचे समन्वयक श्री. तुळशीराम सोनवणे यांनी प्रशासनाला दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *