अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ‘चोवीस नामांचा महिमा’ पुस्तिकेचे भव्य प्रकाशन , संत नामदेवांच्या अभंगरचनेचा प्रथमच ग्रंथरूप अविष्कार; प्रा. डॉ. प्रभाकर जोशी यांचे संपादन
![]()
अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ‘चोवीस नामांचा महिमा’ पुस्तिकेचे भव्य प्रकाशन
संत नामदेवांच्या अभंगरचनेचा प्रथमच ग्रंथरूप अविष्कार; प्रा. डॉ. प्रभाकर जोशी यांचे संपादन
अमळनेर प्रतिनिधी) :
अक्षय तृतीयेच्या पवित्र पर्वावर संत परंपरेचा सन्मान वाढवणारा एक महत्त्वपूर्ण साहित्यिक सोहळा अमळनेर येथे उत्साहात पार पडला. संत नामदेवांच्या अभंगांवर आधारित ‘चोवीस नामांचा महिमा’ या पुस्तिकेचे प्रकाशन परमपूज्य प्रसाद महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
धार्मिक विधींच्या प्रारंभी श्रीविष्णूंच्या पवित्र केशव नामावलीचे श्रद्धेने उच्चारण करण्याची परंपरा आहे. या नामावलीत चंचल मनाला स्थैर्य, शांती व एकाग्रता प्रदान करण्याचे अद्वितीय सामर्थ्य आहे. याच २४ नामांच्या महिम्याचे वर्णन संत नामदेवांनी आपल्या अभंगरचनेत प्रभावीपणे केले आहे. या मौलिक रचनेचा ‘चोवीस नामांचा महिमा’ या नावाने प्रथमच ग्रंथरूपात अविष्कार झाला आहे.
संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रभाकर जोशी यांनी या पुस्तिकेचे संपादन करताना केशव नामावलीचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व उलगडून दाखवले असून, नामदेवांच्या अभंगांचा भावार्थही सुलभ भाषेत मांडला आहे. पुणे येथील एका धार्मिक प्रकाशन संस्थेने ही पुस्तिका प्रकाशित केली आहे.
यात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित अक्षय तृतीया स्तंभारोपण कार्यक्रमात हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी आमदार अनिल पाटील, नगराध्यक्ष परीक्षित बाविस्कर, माजी आमदार शिरीष चौधरी, डॉ. अनिल शिंदे, पोलीस व प्रशासकीय अधिकारी तसेच संत सखाराम महाराज संस्थानाचे विश्वस्त देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात अनेक मान्यवर व हरिभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रा. डॉ. प्रभाकर जोशी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
ही पुस्तिका अवघ्या ६० रुपयांत उपलब्ध असून, संत सखाराम महाराज संस्थानाच्या ग्रंथभांडारात तसेच ९९२२२४९५९९ या क्रमांकावर संपर्क साधून मिळू शकते.

