अमळनेर यात्रेत ठेका पद्धतीवरून वाद पेटला; व्यापारी-पाळणेधारकांचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा, पारंपरिक पद्धत कायम ठेवण्याची मागणी; अन्यथा मोर्चा-धरण्याचा इशारा प्रशासनाला
1 min read

अमळनेर यात्रेत ठेका पद्धतीवरून वाद पेटला; व्यापारी-पाळणेधारकांचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा, पारंपरिक पद्धत कायम ठेवण्याची मागणी; अन्यथा मोर्चा-धरण्याचा इशारा प्रशासनाला

Loading

अमळनेर यात्रेत ठेका पद्धतीवरून वाद पेटला; व्यापारी-पाळणेधारकांचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
पारंपरिक पद्धत कायम ठेवण्याची मागणी; अन्यथा मोर्चा-धरण्याचा इशारा प्रशासनाला

अमळनेर (प्रतिनिधी) :
अमळनेर नगरपरिषदेमार्फत दरवर्षी भरविण्यात येणाऱ्या पारंपरिक यात्रेत यंदा ठेका पद्धती लागू करण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला असून, स्थानिक दुकानदार, पाळणेधारक व नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत हा निर्णय तात्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.

दरवर्षीप्रमाणे नगरपरिषदेमार्फत थेट पावती देऊन शुल्क वसुलीची पारदर्शक पद्धत राबवली जात होती. ही पद्धत स्थानिक व्यावसायिकांच्या हिताची असल्याचे आंदोलकांनी नमूद केले. मात्र यंदा ठेका पद्धतीने वसुली करण्याचा निर्णय घेतल्याने दुकानदारांवर अवाजवी आर्थिक भार पडण्याची शक्यता असून, यामुळे शोषण व भ्रष्टाचाराला वाव मिळू शकतो, अशी तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच, मीना बाजार विखुरल्यास विशेषतः महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या पारंपरिक जागांवर व्यवसाय केला जातो, त्या जागांवरच व्यवसाय करण्यास परवानगी देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

नगरपरिषदेसमोर मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये ठेका पद्धती तात्काळ रद्द करून जुनी पद्धत कायम ठेवणे, मीना बाजार एकाच ठिकाणी ठेवणे तसेच पारंपरिक पाळणेधारकांना त्यांच्या मूळ जागांवर व्यवसायाची संधी देणे यांचा समावेश आहे.

या मागण्यांकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष न दिल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन, धरणे आणि मोर्चा काढण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. तसेच उद्भवणाऱ्या कोणत्याही कायदा व सुव्यवस्था परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी देवा लांडगे (भाजप शहर सरचिटणीस), माजी अध्यक्ष विजय राजपूत, दिलीप ठाकूर, सुभाष पाटील, राहुल चौधरी, रमेश देव, रामभैया कलोसे, महेश संदांशिव, रवी ठाकूर, विजय विठ्ठल पाटील, मनोहर महाजन यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *