तांत्रिक अडचणींवर मात; अमळनेरचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात नगर परिषदेची किमया!
1 min read

तांत्रिक अडचणींवर मात; अमळनेरचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात नगर परिषदेची किमया!

Loading

तांत्रिक अडचणींवर मात; अमळनेरचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात नगर परिषदेची किमया!

अमळनेर प्रतिनिधी
वाढत्या उन्हाळ्यामुळे निसर्गाची साथ कमी मिळत असतानाही अमळनेर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने अत्यंत प्रभावी नियोजन करत शहराचा पाणीपुरवठा कार्यान्वित ठेवण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जळोद नदीची पातळी घटल्याने निर्माण झालेल्या संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ‘कलाली डोहा’तून पाणी उपसा सुरू करून नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे जळोद नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने यापूर्वी दोन्ही जलशुद्धीकरण केंद्रांमधून मिळणारा प्रति तास ८ लाख लिटर पाण्याचा उपसा आता ६ लाख लिटरपर्यंत घटला आहे. म्हणजेच तांत्रिकदृष्ट्या दीड ते दोन लाख लिटरची घट झाली असली, तरी ‘कलाली पंपिंग’ सुरू करून प्रशासनाने पुरवठा खंडित होऊ न देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
पाणीपुरवठा विभागाच्या माहितीनुसार, हिवाळा व पावसाळ्यात पाण्याची मागणी कमी असते; मात्र उन्हाळा सुरू होताच मागणीत मोठी वाढ होते. त्यातच वीजपुरवठा खंडित होणे यांसारख्या अडचणी निर्माण होत असतानाही प्रशासन उपलब्ध पाण्याचे समन्यायी वाटप करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे.
दरम्यान, येत्या ५ ते ७ दिवसांत सुरू होणाऱ्या संत सखाराम महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विशेष ‘बॅकअप प्लॅन’ तयार केला आहे. यात्रेकरूंना पूर्ण दाबाने पाणी मिळेल, याची खात्री पाणीपुरवठा सभापती कैलास नामदेव पाटील यांनी व्यक्त केली आहे.
माजी आमदार शिरीष दादा चौधरी, मुख्याधिकारी गणेश शिंदे, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम व पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली अभियंता सत्यम पाटील, प्रवीणकुमार बैसाने तसेच कर्मचारी विजय विसावे, विशाल देवरे आदींची टीम प्रत्यक्ष फिल्डवर राहून परिस्थिती हाताळत आहे. उपलब्ध ६ लाख लिटर पाण्याचे योग्य नियोजन करून प्रत्येक भागात पाणी पोहोचवण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे.

 

 

 

 

नागरिकांना आवाहन :
सध्याच्या परिस्थितीत पाण्याची मागणी वाढलेली असताना आणि नैसर्गिक स्रोतांमधून उपसा कमी झालेला असताना नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा व प्रशासनाला सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील व नगर परिषदेमार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *