संघर्षातून साकारलेला उत्सव; एकता नगरची भीमजयंती ठरली आदर्श”
![]()
“संघर्षातून साकारलेला उत्सव; एकता नगरची भीमजयंती ठरली आदर्श”
चिखली प्रतिनिधी
एप्रिल, २०२६ च्या माहिती अनुसार जगातील एकूण अंदाजे १९२ देशांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय आनंदात व उत्साहात साजरी होत असताना, बुलढाणा जिल्ह्यातील चिखली नगराच्या हृदयस्थानी असणाऱ्या आठवडी बाजाराच्या शेजारील एकता नगर मधेही ती भीमजयंती साजरी होणे तशी फार मोठी गोष्ट नाही. परंतु स्वातंत्र्यानंतर एकोणऐंशी वर्षांचा कालखंड पूर्ण होतांनाही तेथील विविध जाती धर्माच्या गरीब कुटुंबांच्या अत्यंत बकाल वस्ती मधे एकोणऐंशी इंच रुंदीचेही रस्ते नसतांना व भरीसभर त्यातूनच उघड्यावर हजारो डासांचे साम्राज्य ठरलेल्या घाणपाण्याच्या नाल्या कायम वाहत असताना व त्याच नाल्यांत सार्वजनिक नळाचेही वास्तव्य अगदी पंचशील ध्वजाच्या खांबाशेजारीच असतांना, अशाही परिस्थितीत तेथील कायम रहीवासी गोरगरीब व दीन दलीत आबालवृध्दांनी सर्वधर्मसमभावाची प्रतीक सामूहिक भीम जयंती वर्षानुवर्षे कायम साजरी करण्याची परंपरा जपली, त्यात जे सहिष्णुता दर्शक महात्म्य दिसून येते ते बहुधा इतर ठिकाणी दिसणे कठीण असल्याने येथील भीमजयंती ऐतिहासिक ठरावी असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही ! असे उदगार महाराष्ट्रातील ज्येष्ठ वकील तथा केंद्रीय मानवाधिकार संगठन, नई दिल्लीचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध साहित्यिक कवि व कित्येक दशकांच्या सामाजिक सेवेसाठी सर्वश्रृत असलेले व त्यासाठी साऊथ वेस्टर्न अमेरिकन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट प्राप्त ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे यांनी आपल्या भाषणातून काढले. एवढेच नाही तर क्षितिजा शुभम इंगळे नांवाच्या मुलीने ती डी.एड्. करत असल्याचे सांगून तिच्या महाविद्यालयातून आणलेल्या एका पत्रकातील, बाबासाहेबांच्या महान कार्याचा मजकूर वाचून दाखवण्याची परवानगी मागून धाडसाने सर्व उपस्थितांना सदर माहिती दिली ते पाहून तिचे कौतुक करून शिक्षणाची जिद्द मनात ठेवण्याचा बाबासाहेबांनी दिलेल्या संदेशानुसार वाटचाल करण्यासाठी तिचे अभिनंदन केले. प्रमुख अतिथी म्हणून नागसेन चे सचिव व सामाजिक कार्यकर्ते मा. डॉ. डी. व्ही. खरात यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण व बुद्धवंदना झाली. तर नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे विशेष अतिथी या नात्याने सामाजिक सेवेसाठी सतत सहकार्यशील असणारे जहीर बादशहा भंगारवाले, ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वनाथ बावस्कर व या जयंतीच्या आयोजनात अगदी सुरुवातीपासून हिरीरीने सहभागी असलेले ज्येष्ठ समाजसेवक सत्यविजय गवई, पेंटर किशोर डोणगावकर ( भालेराव ) यांच्या हस्ते भ. गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पार्पण करून उपस्थित ज्येष्ठ कार्यकर्त्या धृपदाबाई घेवंदे, मंदाबाई म्हस्के, सुमनबाई धांडे,
शोभा जाधव, विद्या बावस्कर, पूनम बावस्कर, पूजा इंगळे, सुनिता नाडे, अनिता बावस्कर, अनिल धांडे, राम बावस्कर, सै. आसिफ सै. चांद, सांडू गवई, सलीम भाई, इ. सर्व मंडळींनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सालाबादप्रमाणे श्रम घेऊन सोहळा संपन्न केला. समारोपाच्या निमित्ताने बोलताना स्थानिक नवनिर्वाचित न. प. अध्यक्ष व प्रशासन तथा मा. आमदार एकता नगरच्या पुनरुज्जीवन योजनेवर विचार करतील ही अपेक्षा वर्तवण्यात आली.

