जागतिक विद्वानात भारताचा कायमचा ठसा उमटवणारे प्रज्ञासूर्य डॉ.बी.आर.आंबेडकर
1 min read

जागतिक विद्वानात भारताचा कायमचा ठसा उमटवणारे प्रज्ञासूर्य डॉ.बी.आर.आंबेडकर

Loading

जागतिक विद्वानात भारताचा कायमचा ठसा उमटवणारे प्रज्ञासूर्य डॉ.बी.आर.आंबेडकर
‌‌
‌ भारतामध्ये नवमतवादी प्रबोधनाचा प्रवाह महात्मा फुले यांनी निर्माण केलेला होता. महात्मा फुलेंचे एकनिष्ठ वैचारिक वारस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांचे रक्ताचे नाते नसले तरी बाबासाहेब एकच विचारधारेचे प्रवाही रत्न होते. आपल्या देशाला महात्मा फुलेंनी वेगळा विचार केला. तोच विचार बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण भारतासाठी आदर्श ठरावा असा अप्रतिम विचार शब्दबद्ध केला नव्हे तर नागरिकांच्या मनामनामध्ये रुजविला. मनोवाद्यांच्या तावडीत सापडलेला समाज मानवतेचा विचार करू लागला. छत्रपती शाहू यांच्या संकल्पनेतून सर्व जाती-जमातींना तसेच वंचित घटकांना आरक्षणामुळे सामाजिक न्याय प्रस्थापित ‌करता आला. जर मागास घटकांना आरक्षण दिले नसते तर भारताचा विकास झाला नसता. ज्याप्रमाणे बलवान घोडा कमकुवत शक्ती असलेल्या घोड्याला अन्न खाऊ देत नाही त्याचप्रमाणे सर्वांचा अधिकार असलेल्या गोष्टीवर विशिष्ट लोक ताबा करून बसलेले होते. आज सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश आरक्षणाच्या संख्येनुसार आहेत का ? तर उत्तर मिळते नाही. त्यामुळे वंचित घटकांना न्याय कसा मिळेल? सल्लागारपदी भरवलेल्या जागांमध्ये कालेजियम पद्धत वापरली गेली त्यामध्ये आरक्षणाला डावलून पद भरली जातात.आज आरक्षणाने मिळालेल्या संधीचे वंचित घटकांनी सोने केले. गुलामीच्या दास्यातून वंचित घटकांची सुटका झाली. विशिष्ट वर्ग सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भाषा करीत नव्हता. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या गुरुचे म्हणजे महात्मा फुलेंचे ध्येय संविधान निर्माण करून साध्य केले. हजारो वर्ष जे लोक वंचित घटकांना पशुहीन वागणूक देत होते अशा लोकांना बाबासाहेबांनी स्वाभिमान दिला. बाबासाहेबांनी जगातल्या अनेक चळवळी अभ्यासल्या होत्या. त्यामुळे आपल्या देशासाठी कोणते प्रयत्न आवश्यक आहे हे जाणून त्यांनी समाज सुधारणेला महत्त्व दिले.”शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते प्राशन करील तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.”शिक्षणाने मानवाची प्रगती झाली. तो चिकित्सक पद्धतीने जगू लागला. केवळ शिक्षण देऊन चालणार नाही तर त्या शिक्षणाने चिकित्सा, तर्क, वैज्ञानिक दृष्टिकोन आला पाहिजे या विचाराचे डॉक्टर बाबासाहेब होते. शिक्षित झालेले पहिले पिढी ज्या पिढीकडून बाबासाहेबांना खूप मोठे स्वप्न होते. त्या लोकांनी आपल्याला नोकरी लागल्यानंतर स्वतःच्या आर्थिक उन्नतीचा विचार केला. जर त्यांनी भारतातील वंचित घटकांचा विचार केला असता तर भारतामध्ये शिक्षित पिढीसोबत सुसंस्कारित पिढी घडली असती. म्हणून बाबासाहेब म्हणत होते “मुझे पढे लिखे लोगो ने धोका दिया “! आजच्या शिक्षणाने वैज्ञानिक दृष्टिकोन येत नाही ही मोठी शोकांतिका आहे. उच्चशिक्षित लोक कर्मकांडाला बळी पडत आहे. गरीब जनता कर्म कांड करीत असेल आम्ही समजू शकतो की ते अशिक्षित आहेत. परंतु चांगला शिकलेला समाज मुहूर्त ,कुंडली , ग्रह शांती, नारायण नागबली यासारख्या गोष्टी करीत आहेत.भारतीय नागरिकांना वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईल असे वातावरणच देशांमध्ये निर्माण होऊ दिले जात नाही. बाबासाहेबांनी लहानपणापासून सोसलेल्या असंख्य वेदना, त्रास, अपमान, विषमतेचे चटके यामुळे ह्या विद्वानाने लहानपणापासून ठरवून घेतलेले होते की मला विषमतेने बरबटलेली व्यवस्था बदलवायची आहे. मी सहन केले परंतु यापुढे कोणालाही अशी वेळ येऊ नाही याची दक्षता त्यांनी घेतली. केवळ आपल्या समाजाचा विचार केला नाही. ओबीसी घटकाला न्याय देण्यासाठी राजीनामा सुद्धा दिला. बाबासाहेबांचे वडील रामजी आंबेडकर हे शिक्षणाबद्दल अतिशय जागृत होते. ते सुभेदार असताना शिक्षणाने काय फायदा होतो हे त्यांना माहीत होते. आपल्या घरातून कुणीतरी चांगले शिकून पुढे गेले पाहिजे असे त्यांना वाटत होते. ती चमक त्यांना भिवा मध्ये दिसून आली. ज्ञानासाठी झपाटलेल्या भिवा ला आपल्या मुलीचे दागिने म्हणजेच बाबासाहेबांच्या बहिणीने स्वतःचे दागिने मोडून बाबासाहेबांचे शिक्षण चालू ठेवले. सुभेदार रामजी आंबेडकर कबीर पंथी होते. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये कर्मठ विचार नाही होता. कबीराच्या विचाराच्या सत्संगाच्या ठिकाणी भिवाला ते घेऊन जात असत. भिवाच्या मनावर चिकित्सा, विवेक, परखड विचाराचा चांगला परिणाम झाला. लहानपणीच भीमाला शाळेमध्ये दुय्यम वागणूक मिळाली. पेला घेऊन पाणी पिता आले नाही. बैलगाडीतून जाताना आपली जात सांगितल्यावर खाली उतरवून देण्यात आले. नोकरीच्या ठिकाणी उच्चवर्णीय नोकर डॉक्टर बाबासाहेबांना पाणी देत नव्हता. अशा बुरसटलेल्या विचारांच्या लोकांमध्ये भिमाने संविधानाच्या अप्रतिम ग्रंथाने कायद्याच्या माध्यमातून बदल घडविला. भीमा ज्ञानाची, सत्याची, स्वाभिमानाची पेटती मशाल घेऊन भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकची परीक्षा चांगल्या गुणांनी पास झाल्यामुळे कृष्णाजी केळुस्कर गुरुजींनी स्वागत करून गौतम बुद्धाचे चरित्र सप्रेम भेट म्हणून दिले. भीमरावाने बुद्ध चरित्र वाचल्यावर बुद्धाच्या चिकित्सक विचाराचा प्रभाव त्यांच्यावर झाला. छत्रपती शाहू महाराज, राजे सयाजीराव गायकवाड
यांनी भीमरावांची बुद्धिमत्ता, हुशारी ओळखली होती. त्यामुळे भीमरावाच्या शिक्षणासाठी त्यांनी शिष्यवृत्ती मंजूर केली. बाबासाहेबांनी दिलेल्या शिष्यवृत्तीचे आपल्या देशासाठी सोने केले. थोडाही अतिरिक्त पैसा वापरला नाही. आपल्या ज्ञानाची भूक भागवण्यासाठी वडापाव खाऊन वाचनालयातील पुस्तके अहोरात्र वाचली. या थोर विद्वानास भारताची वेगळी ओळख जगात निर्माण करून द्यायची होती. ज्ञानाची सर्व शिखरे पादाक्रांत करून ‌ गुलामीची चौकट उकडून फेकायची होती. जवळजवळ ३२ पदव्या व ९ भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.ब्रिटिशांनी बाबासाहेबांची बुद्धिमत्ता ओळखली होती. त्यामुळेच भारतातील सर्व लोकांचा विचार करणारा एकमेव विद्वान बाबासाहेब आंबेडकर आहेत हे ते जाणून होते. गोलमेज परिषदेत डॉक्टर बाबासाहेबांनी भारताच्या प्रत्येक नागरिकास स्वातंत्र्य मिळाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. बाबासाहेबांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक बदल घडवायचा होता. धर्माच्या नावाने मांडलेला बाजार थांबवायचा होता. सर्वांना प्रभूची लेकरे म्हणणारे प्रत्यक्ष जगतांना प्रभूच्या लेकरांमध्ये जातीभेद करीत होते.देव नवसाने, पूजा अर्चा, विधी केल्याने प्रसन्न होतो हा खूळा विश्वास संपवायचा होता. फ्रेंच क्रांतीने जगात प्रबोधनाची सुरुवात केलेली होती. भारत मात्र अजूनही कर्मकांडांच्या भोवऱ्यात अडकलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला नवा क्रांतीचा विचार दिला. जो विचार मानवता रुजविणारा होता. सर्व नागरिक समान आहेत. एकमेकांमध्ये भेद नाही. डॉक्टर बाबासाहेबांनी बुद्धाच्या विचाराचा पुरस्कार केला. बुद्धासारख्या महापुरुषांने आत्मा, देव, स्वर्ग, नरक ,नशीब हे नाकारलेले होते. मानव हा त्यांचा केंद्रबिंदू होता. मानवाला सर्वोत्तम स्वातंत्र्य दिले पाहिजे तरच त्याला सर्वांगीण बदल अनुभवता येईल. बुद्ध कुणापुढे लाचार झाले नाही. आपले तार्किक विचार त्याने भारतभर पेरले. आजही बुद्ध अहिंसेचे प्रतीक आहे. जगामध्ये भारताची ओळख बुद्धाच्या अहिंसेने होते. जगात जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. निसर्ग प्रत्येकाला अनुभवता आला पाहिजे. जगातली भीती नाहीशी झाली पाहिजे. बाबासाहेबांनी बुद्धाच्या मार्गाने मार्गक्रमण केले. बाबासाहेबांना अपेक्षित असलेला बुद्ध धम्म भारतात रुजताना दिसत नाही. आम्ही विचार देणाऱ्या लोकांना पंगु केले आहेत. विचार देण्याच्या नावाने देशात लूट चालू आहे. बाबासाहेबांचा समजणारा वैचारिक वर्ग पैसे घेऊन आपले ज्ञान देत आहे. बाबासाहेबांनी निस्वार्थ भाव ठेवून चळवळ उभी केली. पठ्ठे बापूराव यासारख्या तमाशा चालकाकडून पैसे मिळण्याची ऑफर आली होती. परंतु बाबासाहेबांनी आमच्या वंचित घटकातील महिला नाचवून त्यातील पैसा आमच्या चळवळीसाठी नको. असा सवाल करत त्यांची आर्थिक भेट नाकारली. आज चळवळीच्या लोकांना गुंडांचाही पैसा चालतो.प्रत्येक सज्ञान व्यक्तीने समाज जागृतीचे काम केले पाहिजे. प्रत्येक व्यक्ती स्वार्थाने बरबटलेला आहे. बाबासाहेबांनी आपला हक्क मिळविणारा समाज निर्माण केला. आज आम्ही आमचा हक्क मिळवू शकत नाही हे मोठे दुर्दैव आहे. ज्ञानाची जबाबदारी सांभाळणाऱ्या शिक्षकाला वेठबिगार बनविले आहे. धार्मिकतेच्या नावाने बुवा महाराजांचे पेव फुटले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अपेक्षित असलेला समाज निर्माण होत नाहीये. धार्मिकतेच्या नावावर दोन धर्मामध्ये वाद निर्माण केला जातो. विशिष्ट धर्माची सत्ता असावी असे दिवास्वप्न त्यांना पडत आहे.त्यावरच राजकारणी आपली पोळी शेकून घेत आहे. मानवता उभी होईल अशी यंत्रणा आज तरी दिसत नाही. क्रांतीची भाषा करणारे वरवर बोलून पैसा लुबाडत आहे. सामान्य गरीब वंचित याला न्याय मिळत नाही. सर्वसामान्यांपर्यंत प्रेरक विचार पोहोचत नाही.भारतात भ्रष्टाचाराची सर्वोच्च सीमा पार केलेली आहे. काश्मिरात प्रवाशांवर हल्ला करणारे अद्याप सापडलेले नाही. देशाच्या शिक्षणासाठी पाहिजे तेवढा पैसा खर्च केला जात नाही. देशातील प्रार्थना स्थळे बांधण्यासाठी पैसा दिला जातो. शिक्षणासाठी ज्या खऱ्या अर्थाने जीडीपीच्या ६ टक्के पैसा खर्च केला जाईल. त्यावेळीच शिक्षणात बद्दल होईल. आजचे शिक्षण क्रांतीचा विचार देऊ शकत नाही. बाबासाहेबांनी देशाचा सर्वांगीण विकास करण्याचे स्वप्न पाहिले होते. बाबासाहेबांची जयंती आम्ही डीजे वाजवून करीत असतो. डॉक्टर बाबासाहेबांचा विचार डोक्यात न घेता क्रांतीची भाषा बोलत असतो. माझ्या भीमाला पुतळ्यात बंद केलेले आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती गमावून बसलेला समाज निर्माण झालेला आहे. ज्याची सत्ता येते त्याची मनमानी सुरू होते. शेतकऱ्यांना धुळीस मिळविण्यासाठी ३ काळे कायदे तयार आलेले होते. यूजीसी कायदा रद्द करण्यात आला.डॉक्टर बाबासाहेब जागतिक कीर्तीचे विद्वान होते . त्यांनी भारतातील व्यवस्थेचा अभ्यास केलेला होता.अनेक विषयाचे शिक्षण त्यांनी घेतले होते अगदी प्रतिकुल परिस्थितीत जे कुणालाच शक्य नव्हते.देशासाठी स्वतःची मुले गमावली.रमाईने बाबासाहेबांना खडतर साथ दिली .कोणतीच स्त्री रमाई सारखे बलिदान करु शकणार नाही. बाबासाहेबांचे ‘प्रॉब्लेम्स ऑफ रुपी ‘ पुस्तकावरून कित्येक देशाने अर्थनीती तयार केली.मानववंश शास्त्र ते जगातील सर्व संस्कृती त्यांच प्रमाणे इतर देशाच्या राज्यघटना याचा सखोल अभ्यास केला. जणू या महापुरुषाचा जन्म पुस्तके वाचण्यासाठी व भारत देशाची विषमतावादी चौकट मोडण्यासाठी व सर्व प्रकारचे स्वातंत्र्य येथील नागरिकास प्रदान करण्यासाठी झाला होता. आपल्या शीलसंपन्न,विनयशील, कृतीयुक्त जीवन जगण्याच्या सद्गुणांमुळे त्यांचे नैतिक वजन निर्माण झाले होते. विद्वत्ता व विनयशीलता ही त्यांची मालमत्ता होती. पुस्तकासाठी राजगृह बांधणारे ते एकमेव पुस्तक प्रेमी होते. माता रमाई त्यांना विचारायचं तुम्ही डॉक्टर आहात मग आमचा ईलाज का करीत नाही. त्यावेळी ते मिश्किलपणे सांगत ‘रमा,मी पुस्तकांचा डॉक्टर आहे. पुस्तकातील मानव विघातक पुस्तकांची चिरफाड मला जमते. त्यामुळे त्यांनी अनेक ग्रंथातील अमानवी विचाराला विरोध केला. संस्कृत पुस्तकांमध्ये काय दडलेले आहे . पंडित यांना संस्कृत बद्दल कशाचा अभिमान आहे. यासाठी त्यांनी संस्कृत भाषा शिकून घेतली. अनेक गोष्टी शोधण्यासाठी अनेक संस्कृतीचा त्यांनी अभ्यास केला. मनुस्मृती म्हणजे होती मानवतेची विस्मृती.. मनुस्मृतीचा सूक्ष्म अभ्यास करून त्या पुस्तकाला प्रथम जाळणारे एकमेव बाबासाहेब विद्रोही नेता होते . हे पुस्तक अजूनही मनुवादी पुन्हा पुन्हा डोक्यावर घेत आहे. शरद पौंक्षे सारखा मनुवादी म्हणतो मनुस्मृति जाळणारांनी मनुस्मृति वाचली असती तर जाळली नसती. नंतर त्याने आंबेडकरी जनतेची प्रसार माध्यमावर चूक झाल्याचे सांगून माफी मागितली . अजूनही मनुस्मृतीचे भारतामध्ये गोडवे गायले जातात. नथुराम गोडसेला क्रांतिकारी मानले जाते. आज चळवळीचा प्रभाव का पडत नाही तर चळवळी वाहणारे शीलसंपन्न, त्यागी, विनयशील,कृतीशील तसेच नैतिक जीवन जगणारे आदर्शव्रत दिसत नाही. चळवळीच्या नावाने पैसे जमा करणारे , गुंडगिरी करणारे अनेक दिसतात. बाबासाहेबांनी संपूर्ण जीवन भारत देशाला समर्पित केलेले होते. सर्व महिला वर्गावर अतोनात उपकार करुन ठेवले ज्यामुळे तिला पुरुषा बरोबर हक्क मिळाला. हिंदू कोड बीलासाठी बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता. राज्यघटना जर बाबासाहेबांनी लिहली नसती तर मनुवादी विचाराची राज्यघटना तयार झाली असती.. संविधानाने सर्वांना न्याय ,स्वातंत्र्य, समता ,बंधुता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद ही अप्रतिम मूल्य दिली. वैज्ञानिक दृष्टिकोन हा मोठा सुंदर दागिना राज्यघटनेने आम्हाला दिलेला आहे. बाबासाहेबांनी “शिका,संघटीत व्हा आणि संघर्ष करा” हा अनमोल मंत्र आम्हाला दिला. आज आम्ही आमच्या हक्कासाठी संघर्ष करीत नाही . लोक एकत्रित न झाल्याने न्याय मिळत नाही. न्यायासाठी संघर्ष हवा असतो.कर्मचाऱ्यांना मिळणारी हक्काची पेन्शन, जुन्या शिक्षकाला द्यावी लागणार टीईटी हे प्रश्न लोक एकत्रित येऊन संघर्ष करीत नाही म्हणून निर्माण होतो. हक्क मागत नाही त्यासाठी लढत नाही म्हणून प्रश्न अनुत्तरीत आहे. देशातील धार्मिक कार्यासाठी सरकारकडे पैसा आहे. परंतु शिक्षणासाठी, पेन्शन साठी पैसा नाही. संविधानात धर्मनिरपेक्षता असल्यावर सुद्धा भोंदूगिरी खपवून घेतली जाते. भारतात वैचारिक क्रांती निर्माण करणारा समतावादी नेता प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेबासारखा नेता होणे अशक्यप्राय आहे. बाबासाहेबांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचारांचे कायमस्वरूपी स्मरण करणे हीच त्यांना आदरांजली आहे. त्यांनी जगलेल्या कृतीयुक्त जीवनाचा आदर्श ठेवून जगणे ही त्यांना वाहिलेली कृतज्ञता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांचे नेते होते. कुण्या एका समाजाचे नेते नव्हते. सर्वांनी त्यांच्या जीवनाचा आदर्श घेतला पाहिजे. बाबासाहेबांनी स्वाभिमानाने जगण्याचे बळ दिले. व्यवस्था परिवर्तनाचा नवा विचार दिला. बुद्ध धम्म कशा पद्धतीने जगला पाहिजे हे कृतीतून सिद्ध करून दाखवले. जो व्यक्ती बाबासाहेबांचा हा विचार घेईल त्याचे मस्तक अज्ञानासमोर झुकणार नाही. अनेक लोकांनी चळवळीच्या नावाने दालने उघडलेली आहेत पण त्यांच्या बाबासाहेबांचा विचार दिसून येत नाही. बाबासाहेबांची जयंती त्यांनी सांगितलेल्या मार्गावर गेलो तर साजरी केल्यासारखे होईल.

अतिथी संपादक मराठी लाईव्ह न्युज
एस.एच.भवरे
९०७५४१७०३२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *