अमळनेरच्या विकासासाठी नगराध्यक्षांचा स्वामीनारायण चरणी नतमस्तक संकल्प
![]()
अमळनेरच्या विकासासाठी नगराध्यक्षांचा स्वामीनारायण चरणी नतमस्तक संकल्प
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर शहराच्या प्रगतीसाठी सकारात्मक ऊर्जा मिळावी आणि आपल्या कार्यातून जनतेसाठी अधिक चांगले काम घडावे या भावनेतून अमळनेर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी स्टेशन रोडवरील बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात जाऊन भक्तिभावाने प्रार्थना केली.
यावेळी डॉ. बाविस्कर यांनी भगवान स्वामीनारायण, अक्षरब्रह्म गुणातीतानंद स्वामी, घनश्याम महाराज तसेच राधाकृष्ण भगवान यांचे दर्शन घेत शहराच्या विकासासाठी आपल्या हातून अधिकाधिक लोकहिताचे कार्य होऊ दे, अशी मनोभावे प्रार्थना केली. मंदिरातील संत पूज्य योगीस्नेह स्वामी व पूज्य अखंडमुनी स्वामी यांनी नगराध्यक्षांना आशीर्वाद देत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी नगरसेवक मुन्ना शर्मा, मोहन सातपुते, महेश देशमुख, पंकज चौधरी, नाविद शेख आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच परमभक्त प्रीतम मणियार, चंद्रकांत लोहार, जगदीश चौधरी व किशोरभाई सोनी यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी संतांनी बीएपीएस स्वामीनारायण संस्थेच्या विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. परमपूज्य महंत स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सत्संग दीक्षा’ अंतर्गत संस्कृत भाषेतील १५६६ श्लोक बालक-बालिकांकडून मुखपाठ करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. तसेच मंदिरातील नियमित धार्मिक कार्यक्रमांविषयी सांगताना दररोज सकाळी साडेसात वाजता व संध्याकाळी सात वाजता आरती, तसेच प्रवचन, कीर्तन व भजन आयोजित केले जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मंदिरात महिला मंडळ, युवक मंडळ, युवती मंडळ, बाल मंडळ तसेच वडील मंडळ यांच्या माध्यमातून दर रविवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत सत्संग सभा घेतल्या जातात. या माध्यमातून समाजात संस्कार व अध्यात्मिक मूल्ये रुजविण्याचे कार्य सातत्याने सुरू असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

