प्रताप महाविद्यालयाच्या सायमा तेलीची ‘विकसित भारत @2047’ GK क्विझमध्ये जिल्ह्यात बाजी; राष्ट्रीय स्तरासाठी निवड
![]()
प्रताप महाविद्यालयाच्या सायमा तेलीची ‘विकसित भारत @2047’ GK क्विझमध्ये जिल्ह्यात बाजी; राष्ट्रीय स्तरासाठी निवड
अमळनेर प्रतिनिधी : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील M.Sc.-II मायक्रोबायोलॉजीची विद्यार्थिनी कु. सायमा रज्जाक तेली हिने ‘कॅम्पस से संसद – अटल इरादे, युवा कदम’ अंतर्गत आयोजित ‘विकसित भारत @2047’ GK Quiz Competition मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सायमा तेली हिने जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत राष्ट्रीय स्तरावरील पुढील फेरीसाठी निवड मिळवली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित या उपक्रमांतर्गत दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव येथे स्पर्धा घेण्यात आली. प्रताप महाविद्यालयातील तब्बल ७५ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये सायमा तेली हिने उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले. पुढील फेरीच्या अनुषंगाने तिची ऑनलाइन मुलाखतही घेण्यात आली असून, आता ती राष्ट्रीय स्तरावर जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाली आहे.
विशेष म्हणजे, ‘कॅम्पस से संसद’च्या निवड झालेल्या उमेदवारांच्या यादीत जळगाव जिल्ह्यातून सायमा रज्जाक तेली हिचे नाव ८ क्रमांकावर आहे. ती प्रताप ऑटोनॉमस कॉलेज, अमळनेर येथील विद्यार्थिनी असून, या राष्ट्रीय स्तरावरील निवडीमुळे अमळनेर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.
सायमा तेली ही सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक अख्तर तेली यांची बहीण आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे अमळनेरमध्ये आनंदाचे वातावरण असून, तिच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सायमाला मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख प्रा. शशिकांत जोशी, ऑनलाइन मुलाखत परीक्षा समन्वयक प्रा. वैशाली महाजन, तसेच प्रा. सूर्यवंशी-भोसले, प्रा. ममता महाजन यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे सर्व संचालक व पदाधिकारी, प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, IQAC प्रमुख प्रा. डॉ. मुकेश भोळे, सर्व उपप्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, CCMC विभागप्रमुख प्रा. डॉ. धनंजय चौधरी व सहप्रमुख प्रा. डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी सायमा तेलीचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्तरावरील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याने सायमा तेलीने प्रताप महाविद्यालयासह अमळनेरचे नाव उज्ज्वल केले आहे.

