भूमी अभिलेख दिनानिमित्त अमळनेरमध्ये सदिच्छा उपक्रम; डिजिटल सेवांमुळे नागरिकांना दिलासा , अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे सौ. स्मिता गावित यांचा सत्कार; भूमी अभिलेख व्यवस्थेचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित
![]()
भूमी अभिलेख दिनानिमित्त अमळनेरमध्ये सदिच्छा उपक्रम; डिजिटल सेवांमुळे नागरिकांना दिलासा
अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे सौ. स्मिता गावित यांचा सत्कार; भूमी अभिलेख व्यवस्थेचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित
अमळनेर प्रतिनिधी) :
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर यांच्या वतीने भूमी अभिलेख दिनानिमित्त शहरातील सिटी सर्वे कार्यालयात भूमी अभिलेख उपअधीक्षक सौ. स्मिता गावित यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी भूमी अभिलेख विभागाच्या कार्याची उपयुक्तता व ऐतिहासिक पार्श्वभूमी यावर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यालयातील अधिकारी सुहास अहिरे यांनी भूमी अभिलेखनाची माहिती देताना सांगितले की, भारतात भूमी अभिलेखांची परंपरा ब्रिटिशकालापासून अत्यंत अचूक नोंदणी प्रणाली म्हणून विकसित झाली आहे. त्या काळात कर वसुलीसाठी जमीन मोजमापाची प्रक्रिया राबविण्यात आली होती. साखळदंडाच्या साहाय्याने अत्यंत कष्टदायक पद्धतीने हे मोजमाप केले जात असे. या प्रक्रियेदरम्यान अनेक कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून काम केले असून काहींना आपले प्राणही गमवावे लागले, तरीही त्या काळातील नोंदी आजही अचूक असल्याचे त्यांनी नमूद केले.
भूमी अभिलेख व्यवस्थेमुळे जमिनीच्या मालकी हक्कांची स्पष्टता निर्माण होते आणि वादविवाद टाळण्यास मोठी मदत होते, असेही त्यांनी सांगितले. अलीकडच्या काळात या विभागात मोठ्या प्रमाणावर डिजिटलायझेशन झाले असून महाराष्ट्र शासनाच्या ‘महाभूमिलेख’ पोर्टलद्वारे सातबारा उतारे तसेच इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामुळे नागरिकांना कार्यालयीन दिरंगाईपासून दिलासा मिळत असून प्रक्रियेत पारदर्शकता वाढली आहे.
या प्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेरच्या वतीने महिला आयाम प्रमुख अॅड. सौ. भारती, तालुका उपाध्यक्ष सौ. ज्योती भावसार, जिल्हा उपाध्यक्ष सतीश देशमुख, जिल्हा सहसचिव मकसूद बोहरी, जिल्हा ग्राहक संरक्षण समिती सदस्य नरेंद्र बाळू पाटील, जिल्हा बँकिंग व सायबर प्रमुख विजय शुक्ला तसेच जिल्हा ऊर्जा समिती प्रमुख सुनील वाघ यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाची माहिती सौ. मेहराज बोहरी यांनी दिली.

