खड्ड्यांच्या विळख्यात पिंपळी फाटा–अमळगाव मार्ग; नागरिकांचा संताप , पावसाळ्यात प्रवास धोकादायक; खेडी येथील फरशी पुलाची उंची वाढवण्याचीही मागणी
![]()
खड्ड्यांच्या विळख्यात पिंपळी फाटा–अमळगाव मार्ग; नागरिकांचा संताप
पावसाळ्यात प्रवास धोकादायक; खेडी येथील फरशी पुलाची उंची वाढवण्याचीही मागणी
अमळनेर प्रतिनिधी / दिनकरराव पवार
अमळनेर तालुक्यातील पिंपळी फाटा ते अमळगाव या सुमारे तीन किलोमीटरच्या रस्त्यापैकी तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत असून, वाहनचालक आणि नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला असून, संबंधित विभागाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी पंचक्रोशीतील नागरिकांकडून होत आहे.
पिंपळी फाट्यापासून खेडी गावापर्यंतचा रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झाला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी खडी टाकण्यात आली असली तरी प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
खेडी गावातून जाणाऱ्या या मार्गाची स्थिती अधिकच बिकट झाली असून, गावातील अंतर्गत रस्ताही खराब झाल्याने ग्रामस्थांना दैनंदिन ये-जा करणे कठीण झाले आहे. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांची खोली वाढत असून, किरकोळ अपघातांचे प्रमाणही वाढल्याचे स्थानिकांनी सांगितले.
तसेच अमळगाव ते खेडी या सुमारे एक किलोमीटरच्या रस्त्याचीही अवस्था अत्यंत खराब झाली आहे. पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढतो.
याशिवाय खेडी गावालगतच्या नाल्यावर असलेल्या फरशी पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात नाल्याला पाणी आल्यास खवशीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. परिणामी खवशीसह परिसरातील विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार आणि इतर प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, या पुलाची उंची वाढविण्याची मागणीही जोर धरत आहे.
स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती आणि पुलाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे.
—
चौकट


“फरशी पुलाची उंची वाढवणे अत्यावश्यक”
“अमळगाव ते खवशी दरम्यान खेडी येथील फरशी पुलाची उंची वाढविण्यात आल्यास पावसाळ्यात खवशीकडील विद्यार्थ्यांसह नागरिकांची होणारी गैरसोय कायमची दूर होईल. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने पुलाच्या उंचीवाढीचे काम हाती घ्यावे.”
– सौ. आशाताई अरुण गोसावी
प्रभारी सरपंच, खवशी (ता. अमळनेर)

