गांधी तीर्थ राज्यस्तरीय स्वच्छ शाळा स्पर्धा २०२६ अंतर्गत ए. टी. झांबरे विद्यालयाचे मूल्यांकन उत्साहात संपन्न
1 min read

गांधी तीर्थ राज्यस्तरीय स्वच्छ शाळा स्पर्धा २०२६ अंतर्गत ए. टी. झांबरे विद्यालयाचे मूल्यांकन उत्साहात संपन्न

Loading

​गांधी तीर्थ राज्यस्तरीय स्वच्छ शाळा स्पर्धा २०२६ अंतर्गत ए. टी. झांबरे विद्यालयाचे मूल्यांकन उत्साहात संपन्न

​जळगाव (प्रतिनिधी)

दि.१०/०४/२०२६ : गांधी तीर्थ राज्यस्तरीय स्वच्छ शाळा प्रतियोगिता २०२६ अंतर्गत जळगाव येथील ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाने स्वच्छतेच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या शाळांच्या परीक्षण व मूल्यांकन प्रक्रियेअंतर्गत नुकतीच स्पर्धा परीक्षकांनी विद्यालयास विशेष भेट दिली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत राज्यभरातून अनेक शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता, त्यापैकी केवळ ४२ शाळा अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या आहेत. यामध्ये जळगावच्या ए. टी. झांबरे विद्यालयाचा समावेश असणे, ही संपूर्ण शहरासाठी आणि शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
​कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात झाली. विद्यालयातील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या सुमधुर ईशस्तवनाने उपस्थितांची मने जिंकली. ईशस्तवनानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यादेवता सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच स्वच्छतेचा विचार देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वच्छतादूत संत गाडगेबाबा यांच्याही प्रतिमांचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
​याप्रसंगी परीक्षण समितीचे समन्वयक श्री. गिरीश कुलकर्णी, स्पर्धा सहाय्यक श्री. विश्वजीत पाटील आणि श्री. संजय जाधव उपस्थित होते. परीक्षक श्री. गिरीश कुलकर्णी यांनी केवळ औपचारिक पाहणी न करता विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांशी स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण आणि शालेय परिसरातील स्वच्छतेचे महत्त्व या विषयांवर चर्चा केली. विद्यार्थ्यांनीही अत्यंत उत्स्फूर्त आणि आत्मविश्वासपूर्ण उत्तरे देऊन आपल्यातील स्वच्छतेचे संस्कार समितीसमोर अधोरेखित केले.
​परीक्षण समितीने विद्यालय परिसराची अतिशय सूक्ष्म आणि सखोल पाहणी केली. यामध्ये प्रामुख्याने वर्गखोल्यांमधील स्वच्छता, आधुनिक स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची शुद्ध व्यवस्था, शास्त्रोक्त कचरा व्यवस्थापन, वृक्षसंवर्धन आणि शालेय परिसराचे सौंदर्य या घटकांचे निकष तपासण्यात आले. विद्यालयात वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण स्वच्छता उपक्रमांचा एक प्रभावी माहितीपट यावेळी समितीसमोर सादर करण्यात आला. हा माहितीपट सादर करण्याची जबाबदारी श्री. निर्मल चतुर आणि श्री. संदेश करलकर यांनी कौशल्याने पार पाडली, ज्याद्वारे शाळेचा स्वच्छतेचा प्रवास परीक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला.
​या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वितेसाठी समिती अध्यक्षा तथा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे यांचे अमूल्य मार्गदर्शन आणि मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या दूरदृष्टीकोनातून आणि प्रेरणादायी नेतृत्वामुळे हा संपूर्ण उपक्रम अत्यंत सुयोजितरीत्या पार पडला. त्यांना विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. नरेंद्र पालवे यांचेही मोलाचे मार्गदर्शन आणि सक्रिय सहकार्य या प्रक्रियेत लाभले. या दोन्ही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय स्तरावर स्वच्छतेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते.
​या संपूर्ण प्रक्रियेबद्दल आपली भूमिका मांडताना मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे म्हणाल्या की, “केवळ स्पर्धेसाठी नव्हे, तर स्वच्छतेची सवय संस्कार म्हणून रुजविण्याचा आमचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग हेच आमचे खरे यश आहे.”
ज्ञज्ञ​या यशामागे विद्यालयाची एक मोठी टीम कार्यरत असून स्वच्छता समितीच्या प्रमुख सौ. प्रतिभा लोहार यांच्या नेतृत्वाखाली समिती सदस्य श्री. डी. ए. पाटील, श्री. रफिक तडवी, श्री. वेदप्रकाश गडदे आर्य, श्रीमती रोहिणी पाटील, श्रीमती नूतन वराडे, श्री. संदेश करलकर आणि श्री. चेतन सोनार यांनी समर्पित भावनेने कार्य केले.
शाळेतील प्रत्येक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. परीक्षण समितीने विद्यालयाच्या या एकूणच वातावरणाचे आणि शिस्तीचे विशेष कौतुक केले असून, आता अंतिम निकालाबाबत संपूर्ण विद्यालय परिवारामध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *