समतावादी व्यवस्था माणसाच्या प्रगतीचा केंद्रबिंदू ‘ -जयसिंग वाघ
![]()
‘ समतावादी व्यवस्था माणसाच्या प्रगतीचा केंद्रबिंदू ‘
जयसिंग वाघ
——————————————————————-
जळगाव :- भारतीय प्रजासत्ताकाच्या राज्यव्यवस्थेमध्ये समतावादी विचार महापुरुषांनी रुजविण्याचा जो महत्त्वपूर्ण प्रयत्न केला त्या प्रयत्ना मुळेच भारतीय लोकशाहीची सुरक्षितता अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची असून विषमतावादी विचारधारेला समतावादी विचार हा रोखणारा असतो , समताधिष्ठित समाजात माणसाला माणूसपण , प्रतिष्ठा प्राप्त होते व तो आपला सर्वांगीण विकास करून स्वाभिमानाने जगत असतो म्हणूनच समतावादी व्यवस्था माणसाच्या प्रगतीचे केंद्रबिंदू ठरते असे विचार प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले .
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह जळगाव या ठिकाणी समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मुख्यवक्ता म्हणून बोलतांना जयसिंग वाघ बोलत होते .
जयसिंग वाघ यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले की, विषमतावादी व्यवस्थेमुळे आपला देश हजारो वर्षे गुलामगिरीत राहिला . इथला माणूस व देश आपल्या प्रगतीला मुकला , माणसाला पशुतूल्य जीवन मिळाले , अनेकांना जगणे असह्य झाले , महिलांचे जीवन चूल आणि मुल पुरते राहिले तेंव्हा समतेच्या विचारांनी जेंव्हा क्रांती घडून आली तेंव्हा विषमतावादी समाज व्यवस्था बदलविण्यात आली व प्रगतीची सारी दारे मोकळी झाली .
अध्यक्षस्थानी डॉ. मिलिंद बागुल होते याप्रसंगी बोलताना ते म्हणाले भारतीय लोकशाहीच्या दृष्टिकोनातून सामाजिक समतेचा लढा फार महत्त्वाचा आहे .भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ही व्यवस्था निर्माण करण्याचे संविधानिक प्रयत्न केलेले आहेत . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला शिक्षणाचा , समानतेचा विचार आपण अंगीकारत वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याची खरी गरज असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी मांडले
प्रमुख अतिथी बापूराव पानपाटील यांनी समतेचा विचार दृढ करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून त्यासाठी आपल्याला जगाकडे पाहण्याची, शोधण्याची गरज नसून महापुरुषांनी आपल्याला दिलेला विचार हाच आपल्या जीवनाचा सर्वोत्तम सन्मार्ग आहे आणि तो सदोदित आपण विकसित करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी मांडले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यालय अधीक्षक महादेव कांबळे, सुरेश सोनवणे, सतीश सोनवणे यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. विचार मंचावर विशेष अधिकारी अमोल कुलकर्णी सुरेश सोनवणे व मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता गजरे तर आभार प्रदर्शन तनिष्क बोदडे यांनी मानले याप्रसंगी भाग्यश्री चौधरी, मानसी, रिया, रोशनी यांनी पथनाट्य सादर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील अनेक गीत सादर करत व शिल्पा पानपाटील यांनी गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

