राष्ट्र पितामह महात्मा जोतीराव फुले जन्म द्विशताब्दी वर्षाचा शुभारंभ* *11 एप्रिल* – *फुले जयंती, घरोघरी फुले*
1 min read

राष्ट्र पितामह महात्मा जोतीराव फुले जन्म द्विशताब्दी वर्षाचा शुभारंभ* *11 एप्रिल* – *फुले जयंती, घरोघरी फुले*

Loading

*राष्ट्र पितामह महात्मा जोतीराव फुले जन्म द्विशताब्दी वर्षाचा शुभारंभ*
*11 एप्रिल* – *फुले जयंती, घरोघरी फुले*

(विशेष प्रतिनिधी उदय नरे ) :
राष्ट्र पितामह महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्म द्विशताब्दी वर्षाचा शुभारंभ शनिवार, दि. 11 एप्रिल 2026 रोजी होत असून, हा ऐतिहासिक दिवस संपूर्ण राज्यात सणासारखा साजरा करण्याचे आवाहन ‘राष्ट्र पितामह महात्मा जोतीराव फुले जन्म द्विशताब्दी महोत्सव समिती’च्या वतीने करण्यात आले आहे. समाजवादी नेते कपिल पाटील आणि ज्येष्ठ नाटककार व पत्रकार ज्ञानेश महाराव यांच्या पुढाकाराने महोत्सव समितीची स्थापन करण्यात आली आहे. ही समिती राज्यभर विविध उपक्रम राबवून महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर प्रसार करणार आहे.

*घरोघरी फुले*
महात्मा फुले होते म्हणून आज मुलगी शिकतेय याची जाणीव ठेवत फुले जयंती घरोघरी सणासारखी साजरी व्हावी, दारावर फुलांचं तोरण बांधावं, मित्र, नातेवाईक, शेजारी यांना फुले देऊन आनंद वाटावा, त्यातून समाजात प्रेम बंधुता आणि समतेचा संदेश पोहचवावा, असं आवाहन समितीने केलं आहे.

मकरसंक्रांतीला तिळगूळ, दसऱ्याला आपट्याची पाने वाटली जातात, तसेच फुले जयंतीला “फुले वाटण्याची परंपरा” रुजवण्याचा संकल्प फुले विचारांच्या अनुयायी असलेल्या सामाजिक संघटनांनी अलिकडेच एक बैठक घेऊन केला.

———–

*सन्मान पुरस्कार* –
फुले विचारांना अनुसरून राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक कार्य करणार्‍या व्यक्ती आणि आणि संस्थांना सन्मान पुरस्कार देण्याची योजनाही समितीने तयार केली आहे. याबाबत सूचना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

———–

महात्मा फुले यांनी सामाजिक न्याय, स्त्री शिक्षण, शेतकरी हक्क आणि समता यांचा पाया घातला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी त्यांना “महात्म्यांचे महात्मा” असे गौरविले आहे, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या तीन गुरूंमध्ये बुद्ध आणि कबीर यांच्यानंतर फुले यांना स्थान दिले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सत्यशोधक चळवळीला पाठबळ देत त्यांच्या कार्याला बळ दिले.

महात्मा फुले यांनी पहिली शिवजयंती सुरू केली, विधवा ब्राह्मण स्त्रियांचे केशवपन थांबवण्यासाठी लढा दिला, अस्पृश्यांसाठी पाण्याची विहीर खुली केली, तसेच “शेतकऱ्यांचा आसूड” आणि “गुलामगिरी” यांसारख्या ग्रंथांद्वारे सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. स्त्री शिक्षणाची पहाट घडवून त्यांनी आधुनिक भारताचा पाया रचला.

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली राजकीय स्वातंत्र्याचा लढा भारतीय जनतेने जिंकला. म्हणून ते राष्ट्रपिता. तसेच सामाजिक स्वातंत्र्याची लढाई महात्मा फुले यांनी सुरू केली म्हणून ते *राष्ट्रपितामह* ठरतात.

जन्म द्विशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये व्याख्यानमाला, लेखन स्पर्धा, पुस्तिका प्रकाशन, सांस्कृतिक कार्यक्रम, रंगमंचीय सादरीकरणे तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांचा समावेश असेल. सर्व समाजघटकांनी या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कृपया सन्मान पुरस्काराबाबतच्या आपल्या सूचना समितीचे सचिव राजा कांदळकर 9987121300 आणि रोहित ढाले 9869819878 यांना WhaatsApp वर पाठवाव्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *