“योजना कागदावर नाही, नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत!” — खासदार स्मिताताई वाघ यांचा अधिकाऱ्यांना इशारा
![]()
“योजना कागदावर नाही, नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत!” — खासदार स्मिताताई वाघ यांचा अधिकाऱ्यांना इशारा
अमळनेर प्रतिनिधी :
पंचायत समिती जळगाव येथे खासदार स्मिताताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ग्रामीण विकासाशी संबंधित विविध विषयांवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीस गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, मिलिंद चौधरी, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पाटील, तालुका सरचिटणीस गिरीश वराडे, रामचंद्र पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष निवृत्ती पाटील, भाजपा आयटी सेल जिल्हाध्यक्ष वासुदेव कोळी, अभियंता शिसोदे, ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष बबन आप्पा वाघ तसेच ॲडिशनल गटविकास अधिकारी योगिता पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी घरकुल योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अनेक लाभार्थ्यांचे हप्ते प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाही करून हप्ते लवकर वितरित करण्याचे कडक निर्देश स्मिताताई वाघ यांनी दिले. “शासनाच्या योजना वेळेत पोहोचल्या नाहीत, तर त्याचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना बसतो,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
तसेच समाजकल्याण, महिला व बालकल्याण, सेस फंड, वित्त आयोग निधी, सिंचन विहीर व गाय-गोठा अनुदान योजनांचा सखोल आढावा घेत, पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ पारदर्शक आणि वेळेत मिळावा, अशा सूचना देण्यात आल्या. “योजना केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात राबवल्या गेल्या पाहिजेत. नागरिकांना कार्यालयांचे चकरा माराव्या लागू नयेत,” असेही त्यांनी बजावले.
प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचनांसह कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. जिल्ह्याच्या विकासासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात प्रगती साधली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बैठकीत महिला बचत गटांच्या सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला. महिलांना उद्योजकतेकडे वळवण्यासाठी प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य व बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. “महिला बचत गट हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे मजबूत आधारस्तंभ आहेत. योग्य संधी मिळाल्यास महिला केवळ स्वतःच नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि गावाचा आर्थिक विकास घडवू शकतात,” असे मत स्मिताताई वाघ यांनी व्यक्त केले.
महिला उत्पादनांना स्थिर बाजारपेठ मिळावी यासाठी प्रदर्शन, मेळावे, विक्री केंद्रे तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर वाढवण्यावर भर देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. याशिवाय व्यवसाय कौशल्य, पॅकेजिंग, ब्रँडिंग व मार्केटिंग प्रशिक्षण देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या आढावा बैठकीमुळे शासकीय योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळून ग्रामीण भागातील नागरिकांना लवकरच प्रत्यक्ष लाभ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

